भटक्या श्वानांना पालिका देणार ‘डोस’; एका श्वानामागे ६८० रुपये खर्च
By अबोली कुलकर्णी | Published: December 4, 2020 04:17 AM2020-12-04T04:17:58+5:302020-12-04T08:00:53+5:30
एका श्वानामागे ६८० रुपये खर्च लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात भटक्या श्वानांची संख्या वाढत असून, ...
एका श्वानामागे ६८० रुपये खर्च
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात भटक्या श्वानांची संख्या वाढत असून, भटक्या श्वानांकडून दंश होण्याच्या घटनाही घडत आहेत. परिणामी अशा घटनांतून बाधा होऊ नये आणि भटक्या श्वानांची संख्या वाढू नये म्हणून मुंबई महापालिका अशा श्वानांना पकडून निर्बीजीकरण, रेबिज लसीकरण करणार आहे. वर्षाला ३२ हजार श्वानांचे लसीकरण केले जाईल. एका श्वानामागे ६८० रुपये खर्च केले जाणार आहेत.
मुंबई महापालिकेची स्थायी समितीची बैठक शुक्रवारी होणार असून, या बैठकीत याबाबतचा प्रस्ताव सादर हाेईल. त्यानुसार, मुंबई महापालिका भटक्या श्वानांचा बंदोबस्त करण्यासाठी मनुष्यबळासह सात परिमंडळात सात वाहने उपलब्ध करून देणार आहे.
मुंबई महापालिका भटक्या श्वानांना पकडते. त्यांचे लसीकरण करते आणि पुन्हा त्यांना त्यांच्या परिसरात सोडते. जेव्हा २०१४ मध्ये श्वानांची गणना करण्यात आली तेव्हा ९५ हजार १७४ भटक्या श्वानांपैकी २५ हजार ९३५ भटक्या श्वानांचे लसीकरण करण्यात आले नव्हते. मुंबई महापालिका वर्षाला ३० टक्के भटक्या श्वानांचे लसीकरण करण्यासाठी उपाय करत असून, नव्या ७ वाहनांचा प्रस्ताव आगामी स्थायी समितीच्या बैठकीत सादर केला जाईल. एका वर्षाला ३२ हजार भटक्या श्वानांचे लसीकरण केले जाईल.
४ वाहनांमार्फत भटक्या श्वानांच्या लसीकरणाचे काम केले जाणार असून त्यासाठी सात परिमंडळात प्रत्येकी एक वाहन वाढविले जाईल.
................................