लसीकरण माेहिमेतील दुसऱ्या टप्प्यात अतिरिक्त आयुक्तांनाही डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:07 AM2021-02-09T04:07:28+5:302021-02-09T04:07:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्याची मोहीम वेगाने सुरू आहे. प्रत्येक वैद्यकीय कर्मचाऱ्याने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्याची मोहीम वेगाने सुरू आहे. प्रत्येक वैद्यकीय कर्मचाऱ्याने ही लस घ्यावी, यासाठी समुपदेशन केले जात आहे. या मोहिमेअंतर्गत अतिरिक्त पालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी सोमवारी मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयातील लसीकरण केंद्रात लस टोचून घेतली. कोविड लस सुरक्षित असून घाबरण्याचे कारण नाही, असे काकाणी यांनी सांगितले.
लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी यांना लस देण्यास १६ जानेवारीपासून प्रमुख रुग्णालयांसह एकूण २१ केंद्रांवर कोविड लसीकरण सुरू आहे. सुरुवातीला कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम असल्याने या मोहिमेला अल्प प्रतिसाद मिळत होता. मात्र कोणत्याही केंद्रावर जाऊन लस घेण्याची सवलत, समुपदेशन यामुळे आता ७० ते ८० टक्के कर्मचारी लस घेण्यासाठी केंद्रावर हजेरी लावत आहेत. त्यानुसार आतापर्यंत ७५ हजार ७५१ कर्मचाऱ्यांनी लस घेतली आहे.
आता दुसऱ्या टप्प्यामध्ये कोविड आघाडीवर कार्यरत इतर सेवकांचे (फ्रंटलाईन वर्कर्स) लसीकरण सुरू झाले आहे. त्याचाच एक भाग म्हणून नायर रुग्णालयामध्ये अतिरिक्त आयुक्त काकाणी यांना लस देण्यात आली. यावेळी लसीकरणासाठी आवश्यक साठा उपलब्ध असून टप्प्याटप्प्याने लसीकरण सुरळीत सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
.......................
७५ हजार जणांना लस...
पालिकेला आतापर्यंत दोन टप्प्यांमध्ये मिळून दोन लाख ६५ हजार लसींचा साठा मिळाला आहे. पहिला आणि दुसरा टप्पा मिळून आतापर्यंत ७५ हजार ७५१ जणांना लस देण्यात आली आहे. यात ७२ हजार ३८८ आरोग्य कर्मचारी, तर तीन हजार ३६३ फ्रंटलाइन वर्कर्स यांचा समावेश आहे.
परिस्थिती नियंत्रणात, पण सावध रहा...
मुंबईत लोकल सेवा सुरू झाल्यानंतरही गेल्या आठवडाभरात कोविड संसर्गाची स्थिती नियंत्रणात आहे. हे चित्र दिलासादायक असले तरी कोरोना आटोक्यात येत आहे, म्हणून गाफील राहून चालणार नाही. मास्कचा उपयोग, हातांची स्वच्छता, सुरक्षित अंतर राखणे या निर्देशांचे पालन करणे यापुढेही आवश्यक असल्याचे काकाणी यांनी सूचित केले. तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण सुरू झाल्यानंतर पात्र व्यक्तींनी लस घ्यावी. ती पूर्णपणे सुरक्षित असून घाबरण्याचे कोणतेही कारण नाही, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.