लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार, कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस हा २८ दिवसांनंतर देण्याच्या सूचना आहेत. मात्र नुकतेच लॅन्सेट मेडिकल जर्नलमधील संशोधन आॅक्सफर्ड विद्यापीठातील तज्ज्ञांच्या अहवालानुसार, ऑक्सफर्डच्या कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस देण्यात तीन महिन्यांचा कालावधी ठेवल्यास अधिक उपयुक्त ठरेल असा निष्कर्ष मांडला आहे. तीन महिन्यांच्या कालावधीमुळे लसीचा प्रभावीपणा जास्त प्रमाणात दिसून येईल असे अहवालात नमूद आहे.
लॅन्सेटच्या या अहवालानुसार, कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर तीन महिन्यांकरिता ७६ टक्के सुरक्षितता मिळते. तसेच, लसीच्या डोसमध्ये अधिक दिवसांचा कालावधी ठेवल्यास एकाच वेळी मोठ्या प्रमाणात लोकांना लस देण्यास उपलब्ध होईल.
याविषयी, राज्याच्या टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले, लसीच्या दोन डोसमध्ये दोन महिन्यांचा कालावधी गरजेचा आहे. मात्र प्रत्येक ठिकाणी स्थानिक पातळीवरील यंत्रणांनी दिलेल्या निर्देशानुसार लस देण्याबाबत अंमलबजावणी कऱण्यात येत आहे. परंतु हा अहवाल खुद्द ऑक्सफर्डच्या वैद्यकीय तज्ज्ञांनी केल्यामुळे या अहवालातील निरीक्षणेही महत्त्वाची आहेत.