तूर्तास वेगवेगळ्या लसींचे डोस एकत्र नाही,
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:06 AM2021-05-30T04:06:40+5:302021-05-30T04:06:40+5:30
पालिकेचा निर्णय तुर्तास वेगवेगळ्या लसींचे डोस एकत्र नाही, पालिकेचा निर्णय लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : केंद्र शासनाने नुकताच कोव्हॅक्सिन ...
पालिकेचा निर्णय
तुर्तास वेगवेगळ्या लसींचे डोस एकत्र नाही,
पालिकेचा निर्णय
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : केंद्र शासनाने नुकताच कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड लस एकत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच पहिला डोस कोव्हॅक्सिनचा घेतला असेल, तर कोविशिल्डच्या दुसऱ्या लसीचा डोस घेण्याची परवानगी देण्यात आली आहे, परंतु मुंबईत तूर्तास तरी वेगवेगळ्या लसींचे डोस एकत्र देण्यात येणार नसल्याचा निर्णय मुंबई महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे.
अद्यापही सर्वसामान्यांच्या मनामध्ये लसीच्या दुष्परिणामांचा संभ्रम कायम आहे. लसीच्या साइड इफेक्टची भीती अनेकांच्या मनात आहे. केंद्र सरकारने कोरोना लसीकरण मोहिमेसाठी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन या लसींच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे. केंद्राने वेगवेगळ्या लसींचा डोस घेण्यास संमती दर्शविल्यानंतर याविषयी राज्याच्या आरोग्य विभागाने सध्या दोन्ही डोस एकत्र घेण्यास सकारात्मकता दर्शविलेली नाही.
याविषयी पालिकेच्या आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, केंद्र शासनाने दोन वेगवेगळ्या लसींविषयी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली असली, तरी तूर्तास मुंबईत दोन वेगवेगळ्या लसींचे डोस देण्यात येणार नाहीत. येत्या काही दिवसांत लसींचा पुरवठा सुरळीत होईल, त्यानंतर, लसीकरण प्रक्रिया वेगाने राबविण्यात येईल.
* पर्यायी व्यवस्था
लसीकरणात काही काळ विलंब झाला, तरी नुकसान होणार नाही. केंद्र शासनाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार दोन वेगवेगळ्या लसींचे डोस घेणे हा पर्यायी मार्ग आहे. मात्र, याची सक्ती नाही, त्यामुळे याविषयी भीती न बाळगता, लाभार्थ्यांना संयुक्तिक वाटल्यास दोन वेगवेगळ्या लसींचे डाेस घेण्यात काही हरकत नाही
- डॉ.जयेश लेले, इंडियन मेडिकल असोसिएशन
* सर्व पातळ्यांवर चाचण्यांअंती निर्णय
सामान्य लोकांना लसीकरण जितके आवश्यक आहे, तितकेच लसींची कमी उपलब्धता त्यांना लसीकरण टाळण्यास भाग पाडेल. अशा परिस्थितीत लोक दोन वेगवेगळ्या लसी एकत्रित करण्याचा निश्चितच विचार करता येईल. परिणामी, हा निर्णय केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार योग्य आहे. जागतिक आरोग्य संघटना, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील संशोधक आणि अंतिम चाचण्यांनंतर दोन्ही लसींचा डोस घेण्याची संमती मिळाली आहे.
- डॉ.उन्मेष राठोड, फिजिशियन
* या निर्णयाची सक्ती नाही
कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या एकाच स्वरूपाच्या दोन लसी आहेत, पण कदाचित लस घेतल्यानंतर त्याचे परिणाम चांगले होतात, हे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झाले आहे, परंतु लसीकरणानंतरही सर्व प्रकराचे नियम पाळणे गरजेचे आहे. लसींचे वेगवेगळे डोस एकत्र घेणे हा लाभार्थ्यांचा निर्णय आहे, हे सर्वांनी समजून घेतले पाहिजे, हे बंधनकारक नाही.
- डॉ.जयंती शुक्ला, लस विशेषज्ञ
एकूण लसीकरण
आरोग्य कर्मचारी - ३,०२,३३७
फ्रंटलाइन वर्कर - ३,६०,४२५
ज्येष्ठ नागरिक - १२,०६,३११
४५ ते ५९ वयोगट - ११,१३,०५९
१८ तर ४४ वयोगट - १,५०,६४२
स्तनदा माता - ५३७
एकूण लसीकरण - ३१,३३,३११
.............................................