लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईकरांची गेल्या अनेक महिन्यांची प्रतीक्षा अखेर संपली असून मुंबईत लंडनच्या धर्तीवर चालविण्यात येणारी २ कोटींची डबलडेकर इलेक्ट्रिक एसी बस आता बेस्टच्या ताफ्यात आली आहे. आरटीओद्वारे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर मुंबईकरांना पुढील आठवड्यात प्रत्यक्षात या बसमधून प्रवास करता येणार आहे. येत्या काही दिवसांत आणखी ५ बसेस दाखल होणार आहेत. विशेष म्हणजे या बसचे किमान तिकीट एसी बसप्रमाणेच ६ रुपये असणार आहे. त्यामुळे डबलडेकरचा प्रवास खिशालाही परवडणार आहे. मुंबईची शान अशी एकेकाळी डबलडेकर बसची ओळख होती. ही ओळख जपण्यासाठी बेस्ट उपक्रमाने लंडनच्या धर्तीवर मुंबईत एसी डबलडेकर बस चालविण्याचा निर्णय घेतला. अशोक लेलँडची चेसिस आणि स्विस मोबिलिटी कंपनीची ही डबलडेकर बस मुंबईत दाखल झाली आहे.
बेस्ट उपक्रमासाठी हा ऐतिहासिक क्षण असून, मुंबईत मार्चअखेरपर्यंत २० एसी डबलडेकर बसेस धावणार आहेत. या बसेस पर्यावरणपूरक असून, यात टॅप इन टॅप आऊटची सुविधा करण्यात आली आहे. जेणेकरून प्रवाशांना डिजिटल तिकीट काढता येईल. - लोकेश चंद्र, बेस्ट महाव्यवस्थापक
बसमध्ये विशेष काय? बसची किंमत दोन कोटी रुपये असून, भाडेतत्त्वावर घेण्यात आली आहे. इलेक्ट्रिक बस पर्यावरणपूरक असून, यातून कोणतेही वायू, ध्वनी प्रदूषण होणार नाही. दीड तासात इलेक्ट्रिक बस पूर्ण चार्ज होणार एका चार्जिंगमध्ये १२० ते १४० किमीचे अंतर कापणार बसमध्ये पुढे-मागे स्वयंचलित दरवाजे महिलांच्या सुरक्षेसाठी पॅनिक बटन, सीसीटीव्हीची व्यवस्था बसचे लाईव्ह लोकेशन समजणार बसमध्ये ६५ जण बसू शकतात, तसेच ८० प्रवासी उभे राहून प्रवास करू शकतात.
अडीच कोटींचा डिझेलचा खर्च वाचणारभविष्यात २०० डबलडेकर बसेस बेस्टच्या ताफ्यात येणार असून, वर्षाला सुमारे दोन कोटी ६० लाख लिटर डिझेलचा खर्च त्यामुळे वाचणार आहे.