Join us

अंधेरी पोटनिवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंसमोर दुहेरी संकट?; एकनाथ शिंदेंची नवी खेळी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2022 11:08 AM

अंधेरी पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरेंना शह देण्याची रणनीती एकनाथ शिंदेंकडून सुरू आहे

मुंबई - अंधेरी विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर या जागेवर पोटनिवडणूक घेण्यात येत आहे. या जागेवर भाजपा-बाळासाहेबांची शिवसेना संयुक्त उमेदवार देणार असून त्याची थेट लढत काँग्रेस-राष्ट्रवादीनं पाठिंबा दिलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवाराशी होणार आहे. या निवडणुकीत दिवंगत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळाली आहे. परंतु एकनाथ शिंदेंच्या खेळीने उद्धव ठाकरेंवर दुहेरी संकट येण्याची शक्यता आहे. 

ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना शिंदे गटात आणून त्यांना उमेदवारी देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं समोर आले आहे. अंधेरी पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरेंना शह देण्याची रणनीती एकनाथ शिंदेंकडून सुरू आहे. ऋतुजा लटकेंना भाजपा-बाळासाहेबांची शिवसेनेकडून उमेदवारी द्यावी यासाठी मुख्यमंत्री प्रयत्नशील आहेत अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. ऋतुजा लटकेंचा राजीनामा मुंबई महापालिकेकडून मंजूर झाला नाही. त्या अजूनही प्रशासकीय सेवेत आहेत त्यामुळे नवा पेच निर्माण झाला आहे. 

अंधेरी पोटनिवडणुकीसाठी भाजपाकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी दिली जाईल असं मानलं जात असलं तरी अद्याप याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली नाही अशी माहिती भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी दिली. तर बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून ऋतुजा लटकेंना उमेदवारी द्यावी अशी मागणी शिंदे गटातील नेत्यांमध्ये सुरू आहे. शिवाय अंधेरी पोटनिवडणूक शिंदेविरुद्ध ठाकरे गटासाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे. या निवडणुकीतून महापालिकेची चाचपणी होणार आहे. त्यामुळे ऋतुजा लटकेंना आपल्या पक्षात आणून त्यांना उमेदवारी द्यावी असा प्रयत्न सुरू झाला आहे. त्यामुळे निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी २ दिवस बाकी आहे तत्पूर्वी ठाकरे-शिंदे गटात शहकाटशहचं राजकारण सुरू आहे. त्यावर भाजपानं अद्याप मौन बाळगलं आहे. 

मशाल चिन्हावर समता पार्टीचा दावाउद्धव ठाकरेंकडील धनुष्यबाण चिन्ह गेले आणि हाती मशाल आली. मशाल चिन्ह मिळताच ठाकरे गटातील शिवसैनिकांनी जल्लोष व्यक्त केला. त्याचसोबत मशाल हाती घेऊन निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली. परंतु आता पुन्हा ठाकरेंकडील मशाल वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. कारण दिवंगत नेते जॉर्ज फर्नांडिस यांच्या समता पार्टीने मशाल चिन्हावर दावा केला आहे. अंधेरी पोटनिवडणुकीत समता पार्टीही त्यांचा उमेदवार देणार आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाला मिळालेले मशाल चिन्ह समता पार्टीचं नोंदणीकृत चिन्ह असल्याचं सांगितले आहे. याबाबत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगालाही कळवलं आहे. १९९६ पासून मशाल चिन्ह समता पार्टीकडे आहे. त्यामुळे समता पार्टीने घेतलेल्या आक्षेपावर आता बुधवारी केंद्रीय निवडणूक आयोग निर्णय घेण्याची शक्यता आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :एकनाथ शिंदेउद्धव ठाकरेशिवसेना