महाराष्ट्रावर दुहेरी संकट; कोरोनाशी लढतानाच अवकाळी पावसाचाही सामना
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 06:48 PM2020-04-28T18:48:04+5:302020-04-28T18:50:23+5:30
पारा ४१ अंशावर; मुंबईकर ऊकाड्याने हैराण
मुंबई : विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र येथील कमाल तापमानात सातत्याने वाढ नोंदविण्यात येत असतानाच आता येथील बहुतांश ठिकाणांना अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कमाल तापमानाचा विचार करत गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यातील बहुतांशी जिल्हयांचे कमाल तापमान ४० अंशाच्या आसपास नोंदविण्यात येत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्हयाचा विचार करता येथील कमाल तापमान सातत्याने ४० अंश नोंदविण्यात येत आहे. या व्यतीरिक्त जळगाव, मालेगाव, परभणी आणि विदर्भ येथील बहुतांशी शहरांचा कमाल तापमानाचा पारा ४२ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येत आहे. कमाल तापमानात वाढ होत असतानाच आता राज्याला अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आल्याने महाराष्ट्रावर पहिले कोरोना आणि आता अवकाळी पाऊस असे दुहेरी संकट कोसळले आहे.
हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली या जिल्हयांना पावसाचा इशारा देण्यात आला होता. या व्यतीरिक्त पुढील पाच दिवसांसाठी संपुर्ण राज्याला पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विशेषत: २९ ते ३० एप्रिल रोजी मध्य महाराष्ट्र आणि राज्याचा दक्षिण भागाला पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील पाच दिवसांसाठी ज्या जिल्हयांना पावसाचा इशारा देण्यात आला आहेत; त्या जिल्हयांमध्ये पुणे, अहमदनगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, रायगड, सिंधूदुर्ग, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद, गडचिरोली, भंडारा आणि अकोला या जिल्हयांचा समावेश आहे. दरम्यान, राज्यातील बहुतांश ठिकाणांना पावसाचा इशारा देण्यात आला असतानाच दुसरीकडे कमाल तापमानाने कहर केला आहे. परभणी ४०, सोलापूर ४०, जळगाव ४१ आणि औरंगाबाद ४० अशी कमाल तापमानाची नोंद होत आहे. मुंबईचा विचार करता येथील कमाल तापमान ३४ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येत असली तरी येथील ऊकाड्याने मुंबईकरांना घाम फोडला आहे. आता तर काही दिवसांनी मे महिना सुरु होणार असल्याने यात भरच पडणार असल्याचे चित्र आहे.