ऐरोली जंक्शनला डबल डेकर, 3 नवे उड्डाणपूल, तर 6 भुयारी मार्ग
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2023 12:26 PM2023-11-04T12:26:15+5:302023-11-04T12:26:32+5:30
काही जुन्या पुलांची पुनर्बांधणी, जुने पूल पाडून त्या ठिकाणी उभारणार पूल
जयंत होवाळ
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शहरातील काही जुन्या पुलांची पुनर्बांधणी, काही ठिकाणचे जुने पूल पाडून त्याठिकाणी नवे पूल बांधण्याची मोहीम मुंबई महापालिकेने हाती घेतली असताना आता पूर्व आणि पश्चिम उपनगरात आणखी नवे पूल आणि भुयारी मार्ग बांधले जाणार आहेत. ऐरोली जंक्शन येथे तर डबल डेकर उड्डाणपूल पूल बांधला जाणार आहे. एकूण चार ठिकाणी उड्डाणपूल, तर सहा ठिकाणी भुयारी मार्गांची उभारणी केली जाणार आहे.
पश्चिम उपनगरात सुधीर फडके उड्डाणपूल, पार्ले हनुमान रोड आणि मिलन सबवे येथे, तर पूर्व उपनगरात ऐरोली जंक्शन कांजूर मार्ग, जेव्हीएलआर जंक्शन , घाटकोपर जंक्शन, छेडानगर जंक्शन आणि वांद्रे कुर्ला कनेक्टर या ठिकाणी या पायाभूत सुविधा उभारल्या जाणार आहेत.
उड्डाणपूल आणि भुयारी मार्गांचे जाळे
कांजूरमार्ग येथे डम्पिंग ग्राउंड आहे. मुंबईतून कचरा वाहून नेणाऱ्या गाड्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येत असतात. त्यामुळे अन्य वाहनांना अडथळा निर्माण होतो. ते टाळण्यासाठी विक्रोळी कन्नमवारनगर येथे यू-टर्न उड्डाणपूल बांधला जाणार आहे. जेव्हीएलआर जंक्शनजवळ भुयारी मार्ग असेल. घाटकोपर जंक्शन येथे उड्डाणपूल बांधला जाईल.
छेडानगर जंक्शनजवळ भुयारी मार्ग होईल. वांद्रे कुर्ला संकुलात प्रवेश करण्यासाठी चुनाभट्टी येथे बीकेसी कनेक्टर आहे. त्या ठिकाणी यू-टर्न उड्डाणपुलाची उभारणी होईल. पश्चिम उपनगरात सुधीर उड्डाणपूल, विलेपार्ले हनुमान रोड आणि मिलन सबवे या तीन ठिकाणी भुयारी मार्गाची बांधणी होईल. अशा एकूण १० ठिकाणी उड्डाणपूल आणि भुयारी मार्गांचे जाळे आगामी काळात उभारले जाणार आहे.
ऐरोली जंक्शन येथून एक रस्ता नव्या मुंबईच्या दिशेला, तर दुसरा रस्ता नाहूरच्या दिशेने जातो. तिसरा रस्ता सरळ ठाण्याकडे जातो. या ठिकाणी उड्डाणपूल आहे.
मात्र, तीन रस्ते एकत्र असल्याने प्रचंड वाहतूक कोंडी या ठिकाणी असते. ऐरोलीकडून पूर्व द्रुतगती महामार्गावर सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेस तर वाहतूक कोंडी कमाल मर्यादा गाठते.
या कोंडीवर मात करण्यासाठी येथे डबल डेकर उड्डाण पुलासोबत भुयारी मार्ग बांधला जाणार आहे.
‘ॲक्सिस कंट्रोल प्रोजेक्ट’
‘ॲक्सिस कंट्रोल प्रोजेक्ट’ असे या योजनेचे नाव आहे. या प्रकल्पाची पुढील कार्यवाही करण्यासाठी सात नोव्हेंबर रोजी पहिली बैठक होईल. त्यानंतर निविदा प्रक्रिया सुरू होईल. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ही प्रक्रिया पूर्ण होईल.