मुंबई : कोकण रेल्वे स्थानकावर अनेक सोयिसुविधांचा वर्षाव सध्या रेल्वे प्रशासनाकडून केला जात आहे. आता यामध्ये आणखी भर पडणार आहे ती वायफाय सेवा आणि एका नव्या ट्रेनची. मडगाव स्थानकात वायफाय सेवा देतानाच रत्नागिरी-मडगाव ही नवीन ट्रेनही सुरु करण्याचा निर्णय कोकण रेल्वेने घेतला असून रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते शुभारंभ केला जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.सध्या मोबाईल इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. रेल्वे प्रवासात तर प्रवाशांकडून मोबाईल इंटरनेट अधिक वापरले जाते. मात्र स्थानकात आल्यावर कधीकधी इंटरनेट व्यवस्थित सुरु राहात नसल्याचा अनुभव येतो आणि मोठ्या मनस्तापाला प्रवाशांना सामोरे जावे लागते. त्यामुळे स्थानकांवर वायफाय सुविधा मिळावी अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. मात्र वायफाय सुविधा देताना तर रेल्वेला अनेक तांत्रिक अडचणींचा सामनाच करावा लागत असल्याचे दिसते. त्यामुळे रेल्वेत सध्या तरी वायफाय सेवा बरीच मागे आहे. रेल्वेत दिल्ली, बंगळुरु, अहमदाबाद यासह काही मोजक्याच स्थानकांवर वायफाय सेवा आहे. तर मुंबईतील सीएसटी स्थानकात वायफाय सेवा सुरु करण्याच्या हालचाली गेल्या एक वर्षापासून सुरु असून त्याची सध्या चाचणी सुरु आहे. त्याचप्रमाणे मुंबई सेन्ट्रल टर्मिनस आणि वान्द्रे टर्मिनसमध्येही वायफाय सेवा सुरु करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र अजूनपर्यंत कोकण रेल्वेच्या स्थानकांवर वायफायसारखी सेवा अद्यापपर्यंत नाही. कोकण रेल्वेच्या हद्दीत गेल्यावर तर इंटरनेट कनेक्शन फारसे लागत नाही. हे पाहता वायफाय सेवेचा लाभ कोकण रेल्वे प्रवाशांनाही देण्याचा निर्णय कोकण रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. वायफायची पहिली सेवा मडगाव स्थानकात सुरु केली जाणार असल्याचे रेल्वेतील सूत्रांकडून सांगण्यात आले. पहिल्या ३0 मिनिटांपर्यंत वायफाय प्रवाशांना मोफत असणार असून त्यानंतर शुल्क आकारले जाणार असल्याचे सांगण्यात आले. खेड, रत्नागिरी, सावंतवाडी, सिंधुदुर्ग अशा गर्दीच्या काही स्थानकांवरही वायफाय सेवा देण्याचा विचार केला जात आहे. (प्रतिनिधी)च्मडगाव आणि रत्नागिरी प्रवाशांचा प्रवास सुकर करण्यासाठी म्हणून रत्नागिरी-मडगाव ही नविन ट्रेनही सुरु केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.च्दोन्ही सेवांचा शुभारंभ ३१ मार्च रोजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे.
कोकण रेल्वेवर ‘डबल धमाका’
By admin | Published: March 28, 2015 1:29 AM