लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या कालावधीत तपासण्यात आलेल्या ३६१ नमुन्यांपैकी ६१ टक्के नमुन्यांमध्ये डबल म्युटेशन झाल्याचे निदर्शनास आल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. मात्र, एवढ्या कमी प्रमाणातील नमुन्यांवरून म्युटेशन झालेल्या विषाणूचा फैलाव राज्यात झाल्याचे म्हटले जाऊ शकत नाही, असेही तज्ज्ञांचे मत आहे. हे ३६१ नमुने राज्यातील जीनोम सिक्वेन्सिंग प्रयोगशाळांमध्ये तपासण्यात आले आहेत.
पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्थेने तपासलेल्या कोरोनाच्या ३६१ नमुन्यांमध्ये डबल म्युटेशन झाल्याचे दिसून आले. मात्र, महाराष्ट्रातील दररोजच्या चाचण्यांचा विचार करता तपासलेल्या नमुन्यांचे हे प्रमाण अतिशय कमी आहे. महाराष्ट्रात दिवसाला सरासरी दोन लाख चाचण्या केल्या जातात. त्यामुळे इतक्या कमी नमुन्यांवरून राज्यात म्युटेशन झालेल्या विषाणूचा प्रसार झाला असे म्हटले जाऊ शकत नाही, अशी माहिती नॅशनल सेंटर फोर डिसीज कंट्रोलचे संचालक डॉ. सुजित सिंग यांनी दिली.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकाऱ्यांनी राज्यातील, तसेच केंद्रीय जनुकीय क्रमनिर्धारण प्रयोगशाळांच्या नमुना विश्लेषणाबाबतच्या निष्कर्षांच्या संदर्भात संवादाचा अभाव असल्याची तक्रार आरोग्य विभागाचे सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी केली. यामुळे स्थानिक संस्था आणि राज्य आरोग्य अधिकारी अंधारात राहात असून, कोरोना नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात अडथळा निर्माण होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
* म्युटेशन म्हणजे काय
म्युटेशन ही अशी क्रिया आहे, ज्यात संबंधित विषाणू त्याच्याविरोधात केल्या जाणाऱ्या उपायांना दाद न देण्याच्या दृष्टीने स्वतःमध्ये काही जनुकीय बदल घडवून आणत असतो. म्युटेशन होण्यापूर्वीच्या विषाणूसाठी तयार केलेल्या लसीचा किंवा औषधांचा परिणाम म्युटेशन झालेल्या विषाणूवर होईलच याची खात्री देता येत नाही. त्यामुळे जीनोम सिक्वेन्सिंगद्वारे असे म्युटेशन्स शोधण्याचे काम सुरू असते. म्युटेशन्स काही वेळा जास्त धोकादायक असू शकतात, तर काही म्युटेशन्स फारसे धोकादायक नसतात. लस विकसित करून ती देण्याचे काम सध्या मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. त्यामुळे साहजिकच कोरोनाकडूनही स्वतःच्या बचावासाठी म्युटेशन्स सुरू आहे.
..............................