मुंबई : मुंबईत कोरोनाचे प्रमाण कमी होताना दिसत आहे. मुंबईतील कोरोनाचा दुपटीचा दर वाढला असून तो चारशेच्या उंबरठ्यावर आहे. गेल्या २४ तासांत मुंबईत एक हजार ४८ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, २५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे; तर एक हजार ३५९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या सात लाख ४ हजार ५०९ वर पोहोचली आहे. यांपैकी आतापर्यंत १४ हजार ८३३ जणांचा मृत्यू झाला असून, ६ लाख ५९ हजार ८९९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या मुंबईत २७ हजार ६१७ जणांवर उपचार सुरू आहेत. मुंबई जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांचा दर ९४ टक्के झाला असून, २२ मे ते २८ मे २०२१ पर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर ०.१७ टक्के झाला आहे. तसेच मुंबईतील दुपटीचा दर ३९९ दिवसांवर गेला आहे.
मुंबईत शनिवारी २६ हजार ७५१ कोरोना चाचण्या झाल्या असून शनिवारपर्यंत ६२ लाख २९ हजार ३३० चाचण्या झाल्या आहेत. दिवसभरात मृत्यू झालेल्या २५ रुग्णांपैकी १५ रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. यामध्ये १५ रुग्ण पुरुष आणि १० रुग्ण महिला होत्या. ३ रुग्णांचे वय ४० वर्षांखाली होते; तर १३ रुग्णांचे वय ६० वर्षांवर होते आणि उर्वरित नऊ रुग्ण ४० ते ६० वयोगटातील होते.