Join us

डबलसीट जाताय, हेल्मेट अवश्य घाला, डेडलाइन संपली, उद्यापासून दोघांनाही सक्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2022 7:16 AM

helmet : दुचाकीवर मागे बसणाऱ्यालाही हेल्मेटसक्ती करण्याचा निर्णय मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी घेतला. मुंबईकरांना १५ दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला होता.

मुंबई : दुचाकीवर मागे कुणालाही बसवताना त्याला हेल्मेट द्याच... कारण, मागे बसणाऱ्याने हेल्मेट घातले नसले तरी दुचाकी चालवणाऱ्यालाच दंड आकारण्यात येणार आहे. दुचाकीवर मागे बसणाऱ्यालाही हेल्मेटसक्ती करण्याचा निर्णय मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी घेतला. मुंबईकरांना १५ दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला होता.

आता ही डेडलाईन संपली असून, हेल्मेटसक्तीच्या निर्णयाची अंमलबजावणी ९ जूनपासून करण्यात येणार आहे. त्यामुळे ‘’डबलसीट’’ निघालात तर सोबत दोन हेल्मेट घ्यायला विसरू नका. गुरुवारपासून दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यासाठी मुंबईत जागोजागी वाहतूक पोलीस फिल्डिंग लावून उभे राहिलेले दिसणार आहेत. दरम्यान, याप्रकरणी मुंबईकरांनी सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले आहे.

मुंबई वाहतूक पोलिसांनी नुकतीच दुचाकीस्वारासह मागे बसणाऱ्या सहप्रवाशासाठी हेल्मेट अनिवार्य करणारी अधिसूचना जारी केली होती आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार दोन आठवड्यांचा कालावधी संपला असून, गुरुवारपासून दुचाकीस्वार आणि सहप्रवाशाने हेल्मेट परिधान केले नसेल, तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. 

आम्ही त्यांचा परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित करू आणि त्यांना ५०० रुपयांचा दंड ठोठावू, असेही ते म्हणाले. मुंबईत तैनात सर्व ५० वाहतूक पोलीस चौक्यांनादेखील हेल्मेटसक्ती नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यास सांगण्यात आल्याचेही अधिकारी म्हणाले. 

गेल्या आठवड्यात ४० हजार चालकांवर कारवाईपोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या संकल्पनेतून मुंबईत वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार गेल्या आठवड्यात तब्बल ४० हजार ३२० वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांतर्फे कारवाई करण्यात आली आहे.

पोलीस आयुक्तांनी केले नियम पाळण्याचे आवाहन

- मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनीदेखील सोमवारी मुंबईकरांना हेल्मेटबाबतच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. 

- नियम मोडणाऱ्यांना वाहतूक पोलीसदेखील चालान जारी करतील आणि लोकांना कायद्याचे पालन करण्यास सांगतील, असे ते म्हणाले.  

टॅग्स :मुंबई