Join us  

आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2024 5:18 AM

आवाजाचा स्रोत काहीही असो, लाउडस्पीकर डेसिबल पातळीचे उल्लंघन करतात. वेळेची मर्यादा ओलांडून मध्यरात्रीनंतर भाषणे सुरू ठेवली जातात.

मुंबई : गणेश विसर्जन आणि ईद-ए-मिलाददरम्यान काढलेल्या मिरवणुकांतील वाद्यवृंदांमुळे आवाजाची कमाल मर्यादा ओलांडली गेल्याने मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या. निवासी क्षेत्रात आवाजाची मर्यादा ५५ डेसिबल, सांताक्रूझ येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत १०८.५ डेसिबल, तर ईददरम्यान भायखळा येथे ९० डेसिबल आवाजाची नोंद आवाज फाउंडेशनने केली आहे.

आवाजाचा स्रोत काहीही असो, लाउडस्पीकर डेसिबल पातळीचे उल्लंघन करतात. वेळेची मर्यादा ओलांडून मध्यरात्रीनंतर भाषणे सुरू ठेवली जातात.

कोविडनंतरच्या वर्षांत असे लक्षात आले आहे की, आवाजाचे नियम आणि न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून, राजकीय पक्षांनी विसर्जन मिरवणुकांच्या मार्गांवर मध्यरात्रीनंतरही लाउडस्पीकरचा वापर केला, अशी खंत आवाज फाउंडेशनच्या अध्यक्ष सुमेरा अब्दुलअली यांनी व्यक्त केली. उत्सवांत सर्वाधिक ध्वनिप्रदूषण करणाऱ्या लाउडस्पीकरवर बंदी आणावी, अशी मागणी आवाज फाउंडेशनने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

ईद-ए-मिलाद   १८ सप्टेंबर

वेळ    ठिकाण  आवाज  वाद्य

सायं. ५:३९      भायखळा ९०     लाउडस्पीकर

सायं. ६:५७      मुंबई सेंट्रल      ८५.५    लाउडस्पीकर

रात्री ७:३०       मो. अली रोड    १०१    लाउडस्पीकर

ईदमधील भाषणे ध्वनिप्रदूषकच

ईदवेळी लाउडस्पीकर लावून दिलेल्या भाषणांचा आवाज १०१ डेसिबल नोंदविण्यात आला आहे. गेल्यावर्षी १०८.१ डेसिबलची नोंद झाली होती. २०२२ साली डीजेमुळे ११६.३ डेसिबल आवाज नोंदविण्यात आला होता.

फटाक्यांचा दणदणाट

 ऑपेरा हाऊस परिसरात फटाक्यांमुळे ११५ डेसिबल आवाजाची नोंद झाली.

 गिरगाव चौपाटीवर राजकीय पक्षांच्या मंडपांमधील लाउडस्पीकरमुळे मध्यरात्री १२:१४ वाजता ९८ डेसिबल आवाज नोंदविण्यात आला.

गणेश विसर्जन  १७ सप्टेंबर

वेळ    ठिकाण  आवाज  वाद्य

रात्री ७:५९       सांताक्रूझ ८५.६    डीजे

८:०४    सांताक्रूझ १००.५   डीजे

८:२०    सांताक्रूझ १०८.५   ड्रम्स, लाउडस्पीकर

८:५०    जुहू     ९९.६    ड्रम्स, बँजो

८:५५    जुहू     १०१.२   ड्रम्स

९:२८    वांद्रे    ११२.२   ड्रम्स, लाउडस्पीकर

११:०५   कफ परेड       १००.३   ड्रम्स

११:२८   कुलाबा  १०५    ड्रम्स

९:२३    कुलाबा  १०२    डीजे

११:४५   ऑपेरा हाऊस    १०४    ड्रम्स

१२:२२   ऑपेरा हाऊस    ११५    फटाके

यंदा मध्यरात्रीनंतर लाउडस्पीकरचा आवाज उच्च पातळीवर होता. डीजे कमी असतानाही, ढोल-ताशा आणि बँजो लाउडस्पीकरवर असल्याने अनेक मिरवणुकांमध्ये मोठा आवाज झाला.

              - सुमेरा अब्दुलअली, संस्थापक अध्यक्ष, आवाज फाउंडेशन