पीपीई किट, मास्क खरेदीवर पुन्हा संशय; अपुऱ्या माहितीमुळे स्थायी समितीने प्रस्ताव रोखला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2021 10:06 PM2021-08-18T22:06:39+5:302021-08-18T22:06:45+5:30
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी पालिकेने आठ कोटी ७० लाख रुपयांचे पीपीई किट, थ्री प्लाय आणि एन ९५ मास्कची खरेदी करण्यात येणार आहे.
मुंबई- कोरोनाची तिसरी लाट येण्याचा धोका आरोग्य तज्ज्ञांनी वर्तविला आहे. तत्पूर्वी पालिकेने सर्व खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्यानुसार पीपीई किट, थ्री प्लाय मास्क आणि एन ९५ मास्क खरेदी करण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीपुढे मांडण्यात आला. मात्र, यामध्ये अपूर्ण माहिती असल्याने स्थायी समितीने हा प्रस्ताव राखून ठेवला आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी पालिकेने आठ कोटी ७० लाख रुपयांचे पीपीई किट, थ्री प्लाय आणि एन ९५ मास्कची खरेदी करण्यात येणार आहे. मात्र, या प्रस्तावात किती साहित्य घेणार? प्रत्येक साहित्यासाठी किती खर्च येणार? याची माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे या खरेदीवर संशय व्यक्त केला जात आहे. अधिक माहितीची आवश्यकता असल्याने हा प्रस्ताव राखून ठेवण्यात आला असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सांगितले.
यामुळे खरेदीवर संशय....
कोविडच्या पहिल्या लाटेत पालिकेने पीपीई किट , थ्री प्लाय मास्क, एन ९५ मास्कची खरेदी चढ्या दराने केल्याचे आरोप होत होते. त्यामुळे आताही प्रशासनाकडून अपुरी माहिती सादर झाल्याने संशय निर्माण होत आहे. इतर प्रस्तावात प्रशासनामार्फत प्रत्येक वस्तूची किंमत जाहीर केली जाते. मात्र, या प्रस्तावात अशी कोणतीही माहिती दिलेली नाही.
यावर आक्षेप...
बाधित रुग्णांवर उपचार करताना या सर्व वस्तू महत्वाच्या असतात. कोविड कक्षात पीपीई किट घातल्याशिवाय प्रवेश करता येत नाही. कोरोनाच्या पहिल्या लाटेच्यावेळी पीपीई किटसह वैद्यकिय मास्कचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यावेळी गरजेनुसार या साहित्याची निर्मीतीही होत नव्हती. मात्र, आता तशी परिस्थिती नसताना पालिका चढ्या दराने या साहित्यांची खरेदी करीत असल्याचा आरोप केला जात आहे.