निर्बंधांबाबत शंका - समाधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:08 AM2021-04-23T04:08:10+5:302021-04-23T04:08:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : ब्रेक द चेनअंतर्गत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. १ मे रोजी सकाळी ७ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ब्रेक द चेनअंतर्गत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. १ मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत हे निर्बंध लागू असल्याने नागरिकांच्या मनात विविध प्रश्न आहेत. यातील काही प्रश्नांची उत्तरे गुरुवारी राज्य सरकारने दिली आहेत. टॅक्सीची सेवा वापरता येणार का, लोकलमध्ये प्रवेश मिळेल का? येथपासून पर्यंतची काही प्रश्ने आणि उत्तरे पुढीलप्रमाणे :-
शंका - डाॅक्टर, वैद्यकीय कर्मचारी कोणत्याही निर्बंधांशिवाय प्रवास करू शकतात का?
समाधान - होय. डाॅक्टर, वैद्यकीय कर्मचाऱ्यांना खासगी अथवा सार्वजनिक वाहनाने प्रवास करता येणार आहे. मात्र, या प्रवासादरम्यान त्यांना प्राधिकृत व्यक्ती किंवा त्यांच्या आस्थापनेने दिलेले ओळखपत्र सोबत बाळगावे लागेल. हा प्रवास वैद्यकीय कारणासाठी असेल, अशी अपेक्षा मात्र असणार आहे.
शंका - लोकल प्रवासाची मुभा कोणाकोणाला असणार आहे?
समाधान - फक्त सरकारी कर्मचारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची मुभा आहे. याव्यतिरिक्त कोणालाच लोकल प्रवासाची मुभा नसेल. अगदी अत्यावश्यक सेवेत समाविष्ट असलेल्या सेवेतील नागरिकांनाही लोकल सेवेचा लाभ घेता येणार नाही.
शंका- निर्यात संबंधित आस्थापना सुरू राहतील का?
समाधान - निर्यातीचे सध्याचे दायित्व पूर्ण करण्यासाठी या आस्थापना सुरू ठेवता येतील. यासंदर्भातील मालाच्या वाहतुकीलाही परवानगी असणार आहे.
शंका - बँकांनाही १५ टक्के उपस्थितीचा नियम लागू असणार आहे का?
समाधान - होय. बँकांनाही १५ टक्के किंवा ५ कर्मचारी यापैकी जे जास्त असेल त्या मनुष्यबळात काम करावे लागणार आहे.
शंका - ऑटो रिक्षा किंवा टॅक्सी सेवेचा लाभ कोणाला घेता येईल?
समाधान - १)अत्यावश्यक सेवेतील नागरिक २) वैद्यकीय कारणासाठी ३) याशिवाय १३ एप्रिलच्या आदेशात नोंदविलेल्या वैध कारणांसाठी जसे की विमानतळ, लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवासासाठी स्थानक, बस स्टँडवर जाण्यासाठी किंवा तिथून येण्यासाठी.
शंका - आंतरजिल्हा प्रवासाची परवानगी आहे का?
समाधान - केवळ अत्यंत महत्त्वाच्या कामासाठीच खासगी वाहनाने, कारने आंतरजिल्हा प्रवास करता येणार आहे. यात वैद्यकीय आणीबाणी, कुटुंबातील मृत्यू आदी कारणांचा अंतर्भाव आहे. लांब पल्ल्याचा रेल्वे किंवा बस प्रवास करता येणार असला तरी गृहविलगीकरणासारख्या नियमांचे बंधन असेल.
शंका - सरकारी कार्यालयात अभ्यागतांना प्रवेश असणार आहे का?
समाधान - नाही. मात्र, नोंदणीसारख्या कामांसाठी नागरिकांना पूर्वपरवानगीने रजिस्ट्रार कार्यालयात जाता येईल. या कार्यालयातही १५ टक्के उपस्थितीचा नियम लागू करण्यात आला आहे.
शंका - शाळा, महाविद्यालये, विद्यापीठांचे काय?
समाधान - शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ बंद असतील. मात्र, आस्थापनांच्या आवश्यकतेनुसार कर्मचारी, शिक्षण किंवा शिक्षणेतर कर्मचारी १५ टक्के किंवा पाच यापैकी जे जास्त असेल त्या प्रमाणात संस्थेत येऊ शकतात.
शंका - आरटीपीसीआर, आरएटी किंवा नॅट चाचणी कोणाला बंधनकारक आहे?
समाधान - परीक्षेसाठीचे पर्यवेक्षक, तपासनीस आदी कार्यातील नागरिक, ज्या हाॅलमध्ये लग्न सभारंभ आहे तेथील कर्मचारी, कॅटरिंग आदी.
शंका - ई-काॅमर्स कंपन्याच होम डिलिव्हरी सेवा देतील की अन्य कंपन्यांनाही परवानगी आहे?
समाधान - होम डिलिव्हरीची परवानगी असणाऱ्या आस्थापनांनी प्राधिकृत केलेल्या लोकांनी म्हणजे संबंधित हाॅटेलने नेमलेल्या व्यक्तीला होम डिलिव्हरी देता येईल. ई-काॅमर्सच हवे, असे बंधन नाही.
शंका - विनाकारण फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा अधिकार कोणाला आहे? दंड भरण्यासाठीची रक्कम नसेल तर काय होणार?
समाधान - स्थानिक आपत्ती निवारण प्राधिकरण आणि त्यांनी नेमलेले, अधिकृत केलेल्या व्यक्तींकडून दंडाची रक्कम वसूल केली जाईल. दंडाची रक्कम नसेल तर मोटार वाहन कायदा किंवा तत्सम कायद्याअंतर्गत कारवाई केली जाईल.
शंका - आंतरजिल्हा प्रवासासाठी कोणत्याही कागदपत्रांची, पासची आवश्यकता असेल?
समाधान - वैध, अत्यावश्यक कामासाठीच प्रवास करता येणार आहे. सध्या पास वगैरेची व्यवस्था करण्यात आलेली नाही. पटेल असे, विश्वसनीय कारण, स्थिती असावी. स्थानिक अधिकाऱ्यांनी यासंदर्भात निर्णय घ्यावा.
शंका - झोमॅटो किंवा स्वीगीलासुद्धा केवळ रात्री ८ पर्यंत होम डिलिव्हरी करावी लागणार आहे का?
समाधान - झोमॅटो किंवा स्वीगीसाठी वेगळा, स्वतंत्र नियम नाही. सर्वांना समान वेळ असणार आहे. मात्र, वेळेची मर्यादा स्थानिक प्रशासनाकडून निश्चित केली जाईल.
शंका - सरकारी कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्राॅम होम’साठी काही आदेश आहेत का?
समाधान - १५ टक्के उपस्थिती म्हणजे उर्वरित ८५ टक्के कर्मचाऱ्यांना सुट्टी मंजूर केली असे नाही. उर्वरित ८५ टक्क्यांना ‘वर्क फ्राॅम होम’ असणार आहे. त्यासाठी विभागांनी ई-ऑफिस, टेले-मीटिंग आदी राबवावेत.
शंका - वकील, क्लर्क, न्यायालयीन कर्मचारी आदींच्या प्रवासाबाबत संभ्रम आहे.
समाधान - वकिलांची कार्यालये अत्यावश्यक सेवेत असल्याने ती सुरू असतील. त्यांना कामासाठी प्रवास करता येईल. परंतु त्यांना लोकल, मेट्रो किंवा मोनोचा वापर करता येणार नाही. खासगी वाहनाने, टॅक्सी किंवा सार्वजनिक अथवा खासगी बसने जाता येईल.
शंका - बाहेरच्या शहरात, राज्यात अडकून पडलेली व्यक्ती कारने घरी जाऊ शकते का? कामानिमित्त आंतरजिल्हा प्रवास करता येईल? मुंबई विमानतळावरून उड्डाण करण्यासाठी राज्यातील एखाद्या जिल्ह्यातून येता येईल?
समाधान - बाहेर अडकून पडलेली व्यक्ती लांब पल्ल्याची रेल्वेगाडी, बस किंबा विमानाने आपल्या शहरात येऊ शकेल. तिथून रिक्षा किंवा टॅक्सीने त्यांना घर गाठता येईल.
- कामासाठी आंतरजिल्हा प्रवास करता येईल का?
- त्यांच्या शहरात विमानतळ नसेल किंवा उड्डाणाची सोय नसेल तरच. परंतु संबंधितांकडे बोर्डिंग पास असायला हवे. याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केल्यास नियमानुसार दंड वसूल केला जाईल.
..........................................