Join us

...म्हणून ऐन निवडणुकीच्या प्रचारात सुप्रिया सुळेंना डॉक्टरांनी दिला विश्रांती करण्याचा सल्ला 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 11:30 AM

सुप्रिया सुळे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील कलगीतुरा मागील काही दिवसांत पाहायला मिळाला होता.

मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला राज्यात रंगत आली आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. मात्र ऐन प्रचाराच्या रणधुमाळीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना विश्रांती करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. खुद्द सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या फेसबुक पेजवरुन ही माहिती दिली आहे. 

सुप्रिया सुळे यांनी पोस्ट करुन म्हटलं आहे की, ऐन प्रचाराच्या धामधुमीत सर्वांसोबत खांद्याला खांदा लावून लढण्यासाठी मी सज्ज आहे. परंतु डासांचा उच्छाद अखेर भोवला...! मला डेंग्यूची लागण झाली असून डॉक्टरांनी विश्रांती करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे विरोधकांच्या प्रचारातील एक हत्यार कमी होणार असल्याचं चिन्ह दिसत आहे. 

सुप्रिया सुळे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील कलगीतुरा मागील काही दिवसांत पाहायला मिळाला होता. अलीकडेच सुप्रिया सुळेंनी आरेतील मेट्रो कारशेडविरोधात आवाज उठविला होता. तर पक्षांतर करणाऱ्या नेत्यांविरोधात बोलताना सुप्रिया सुळेंनी भाजपाला टोला लगावला होता. भाजपाकडे अशी कसली वॉशिंग पावडर आहे, जो आमच्याकडे आहे त्याच्यावर आरोप होतात अन् भाजपात गेल्यावर साफ होतात असा सवाल त्यांनी केला होता. त्यावर मुख्यमंत्र्यांनी आम्ही कुठलीही वॉशिंग पावडर वापरत नाही, आमच्याकडे विकासाचं डॅशिंग रसायन आहे असं उत्तर दिलं होतं. 

त्यानंतर पुन्हा सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करत सांगितले की, भाजपाकडे डॅशिंग रसायन आहे. रसायनाच्या कारखान्यात जाता तेव्हा काळजी घ्यावी लागते. त्यामुळे रसायनाचा विकास तुम्हाला हवाय की, आम्ही केलेला विकास हवा आहे. मी एक सायन्स स्टुंडट असल्याने सांगू शकते की सगळीच रसायने चांगली नसतात. हा रसायनाचा विकास आहे, रसायनातून काही गोष्टी नष्टही होतात त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या रसायनापासून सावध राहा, हे रसायन घातक आहे असा टोला त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला होता. मात्र सुप्रिया सुळेंना झालेल्या डेंग्युमुळे ऐन निवडणुकीच्या धामधुमीत विरोधकांकडे असणारं एक हत्यार कमी झाल्याचा फायदा सत्ताधाऱ्यांना होणार असल्याची चर्चा आहे.   

टॅग्स :सुप्रिया सुळेदेवेंद्र फडणवीसराष्ट्रवादी काँग्रेसनिवडणूक