मसिना रुग्णालयाच्या जुन्या इमारतीची पडझड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 02:58 AM2019-02-19T02:58:34+5:302019-02-19T02:58:50+5:30
‘ग्रेट टु बी’चा हेरिटेज दर्जा : २२ कोटी अपेक्षित
मुंबई : भायखळा येथील मसिना रुग्णालयाची इमारत ११६ वर्षांपूर्वीची जुनी आहे़ तिच्या पुनर्बांधणीसाठी २२ कोटी रुपयांचा निधी आवश्यक आहे. सध्या इमारतीची अवस्था गंभीर असून भिंतीवरचे सिमेंट गळून पडत आहे. खिडक्याही तुटलेल्या स्थितीमध्ये आहे. इमारतीचे छज्जे गायब झाले आहेत. एकंदरीत रूग्णालयाच्या इमारतीची अवस्था बिकट आहे. सध्या इमारतीमध्ये संस्थेचे कार्यालय आणि ओपीडी सुरु आहे. इमारतीच्या दुरूस्तीमुळे रुग्णालयाचे कामकाज दुसऱ्या इमारतीमध्ये स्थलांतर करण्यात आले आहे.
ज्यू व्यवसायिक डेव्हिड ससून यांचा हा बंगला १८५४ साली बांधण्यात आला होता. ससून कुटुंबियाने हा बंगला डॉक्टर हार्मसजी मनेजी मसिना यांना रूग्णालय सुरु करण्यासाठी दान स्वरुपात दिला. तेव्हापासून ते आजतागायत मसीना रूग्णालयात रुग्णांची सेवा केली जातेय. परंतु अठराव्या शतकातल्या ऐतिहासिक इमारतीची पडझड सुरू झाली आहे़ तिची डागडुजी करणे आवश्यक आहे. या वास्तूला ‘ग्रेट टु बी’चा हेरिटेज दर्जा मिळाला आहे़ त्याचे जतन होणे आवश्यक आहे. मात्र, तरीही इमारतीच्या पुर्नबांधणीचे काम रखडलेल्या स्थितीत आहे. रूग्णालायच्या पुनर्बांधणीसाठी रेस्टोरेशन कमिटीला या संदर्भात पत्र द्यायचे आहे. हेरिटेज हा संवेदनशील विषय असल्याने योग्य पद्धतीने सर्व परवानग्यासाठी कागद पत्रांची पुर्तता करावी लागेल. येत्या आठवड्यात रेस्टोरेशन समिटीला पत्र पाठविले जाईल. छप्पर, रुग्णालयातील आतील काम आणि इमारतीच्या बाहेरील काम असे या कामाचे स्वरुप असणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल रेल्वे स्थानक, फ्लोरा फाऊंटन, डॉ. भाऊ दाजी लाड वस्तूसंग्रहालय यासारखी कामे करणाºया हेरिटेज आर्किटेक्चर विकास दिलावरी यांच्याकडून काम केले जाणार आहे, अशी माहिती मसिना रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. व्ही. जोखी यांनी दिली.
संस्थेकडे इमारतीचा संपूर्ण आराखडा तयार आहे. आतापर्यंत इमारतीच्या डागडुजीसाठी कोणत्याही प्रकारचा निधी जमा झालेला नाही. इमारतीच्या डागडुजीसाठी २० ते २२ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. इमारतीच्या वरचा मजला हा गायब झाला आहे. आता जिथे ओपीडी सुरु आहे. तिथे ससून यांचा घोड्यांचा तबेला होता.
यासंदर्भात मसिना रुग्णालय एक जिर्णोध्दार समितीची स्थापना करणार आहे. यात पारसी आणि ज्यू समाजातील लोकांना एकत्र घेऊन समिती तयार केली जाईल. तसेच ज्यू समाजातील हेरिटेज वास्तूचा इतिहास सर्व सामान्यांना कळावा; यासाठी प्रदर्शन कलादालनही उभारण्यात येणार आहे, असेही डॉ. व्ही. जोखी यांनी सांगितले.
ससून यांनी भेट स्वरूपात दिला बंगला
डॉक्टर हार्मसजी मसिना यांनी ससून कुटुंबियाचा उपचार केला होता. ससून कुटुंबियाला मसिना यांचा स्वभाव आणि वागणूक आवडली. त्यामुळे जेव्हा ससून कुटुंबिय देश सोडुन गेले, तेव्हा त्यांनी बंगला आणि सभोवतालची जमीन भेट स्वरुपात मसिना यांना दिली. १९०२ साली मसिना यांनी रुग्णालय सुरू केले.