हुंड्याचा सोस कमी होईना

By admin | Published: August 5, 2015 12:44 AM2015-08-05T00:44:57+5:302015-08-05T00:44:57+5:30

पुरोगामी महाराष्ट्र एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करतोय. परंतु अजूनही स्त्रियांवरील अत्याचार, अनिष्ट रुढी-परंपरा समूळ नष्ट झाल्या आहेत का, असा प्रश्न उपस्थित

Dowry shortage | हुंड्याचा सोस कमी होईना

हुंड्याचा सोस कमी होईना

Next

पुरोगामी महाराष्ट्र एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करतोय. परंतु अजूनही स्त्रियांवरील अत्याचार, अनिष्ट रुढी-परंपरा समूळ नष्ट झाल्या आहेत का, असा प्रश्न उपस्थित होताच त्याचे उत्तर ‘नाही’ असेच येते. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतदेखील विवाहितांचा हुंड्यासाठी छळ करण्याच्या घटनांमध्ये रोज वाढ होत आहे. हुंड्यासारख्या प्रथेचा अजूनही मुंबईकरांवर किती पगडा आहे, हे दर्शवणारे हे विशेष वृत्त...
मुंबई : मुंबईतील विविध भागांत राहणाऱ्या विवाहित, अविवाहित महिलांशी संवाद साधला असता उच्चशिक्षित कुटुंबांमध्येही हुंड्यासारखी प्रथा अजूनही तळ ठोकून असल्याचे यानिमित्ताने ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणात दिसून आले.
उच्चशिक्षित असल्यामुळेच हुंड्याची मागणी सर्वांत जास्त होत असल्याचे मत ८४ टक्के महिलांनी व्यक्त केले. तर ६६ टक्के महिलांना कायद्याचे ज्ञान असताना तसेच सुशिक्षित असूनही हुंड्याला विरोध दर्शवणे कठीण बनत आहे. १०० टक्के महिलांनी हुंडा देण्यास विरोध दर्शवला. मात्र हुंडा न दिल्याने महिलांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष छळ सहन करावा लागत असल्याचे धक्कादायक वास्तवदेखील यातून समोर आले.
कमावत्या महिलांकडूनही हुंड्याची अपेक्षा केली जाते. शिवाय संपूर्ण पगारही सासरच्यांनाच द्यावा लागतो, असे ९६ टक्के महिलांचे म्हणणे आहे. घटस्फोटासाठीही हेच कारण मुख्य ठरत असल्याचे ५४ टक्के महिलांचे मत आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिसांकडून विविध उपक्रम राबविले जातात. नोकरीसाठी बाहेर पडणारी महिला घरातही असुरक्षित असल्याचे वास्तव पोलिसांच्या आकडेवारीतून समोर येते. गेल्या वर्षीच्या ५७२ गुन्ह्यांच्या तुलनेत यंदा पहिल्या सात महिन्यांत ३९२ गुन्ह्यांची नोंद झाली आहे.
बंध तुटले... : हुंड्यासह विविध कारणांनी घटस्फोट घेण्यासाठी महिन्याकाठी १००० हून अधिक अर्ज कौटुंबिक न्यायालयात दाखल होतात. पैकी ५०० ते ६०० खटले सुरू असताना २०१४ च्या नोव्हेंबर अखेर ३१२० खटले दाखल झाले. २०१३ मध्ये ही संख्या तब्बल ५७१५ एवढी होती.
आजही मुंबईसारख्या शहरात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसते. याबाबत जनजागृती करून पीडित महिलांनी आवाज उठविणे गरजेचे आहे. महिला छळ प्रकरणी केवळ गुन्हे दाखल होता कामा नये. तर हे खटले मार्गी लागणे गरजेचे आहे.
- सुगंधी फ्रान्सिस, जनवादी महिला संघटना
महिलांनी पुढे यावे : महिलांसाठी विशेष तक्रार निवारण कक्ष उघडण्यात आला आहे. त्यातही विशेषत: हुंडाबळीच्या घटनांमध्ये तक्रार घेऊन आलेल्या महिलांचे समुपदेशन करण्यात येते. त्यानंतर संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येतो. कुठेही महिलांना हुंड्याबाबत मागणी अथवा अत्याचार होत असतील त्यांनी पोलीस ठाण्यात यावे. पोलीस त्यांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असतील. - धनंजय कुलकर्णी, मुंबई पोलीस दलाचे प्रवक्ते
५ वर्षांपूर्वी लग्न झालेल्या मुलीच्या आयुष्यात आत्महत्येचा प्रयत्न करण्याची वेळ येईल, असे विक्रोळीच्या राजापकार कुटुंबीयांना स्वप्नातही वाटले नव्हते.
मुलगा आयटी इंडस्ट्रीत असल्याने राजापकार कुटुंबीयांनी श्रावणीचे लग्न संतोष आंबेकरशी लावून दिले. काही वर्षांतच आंबेकर कुटुंबीय बंगळुरूला स्थायिक झाले.
परंतु भाड्याच्या घरात राहावे लागत असल्यामुळे संतोष आणि त्याच्या आईने श्रावणीजवळ माहेरहून पैसे आणण्यासाठी तगादा लावला.
त्यानुसार माहेरच्या मंडळींनी पाच लाख रुपये आणि एक टीव्ही पाठविला. परंतु सासरच्या मंडळींच्या मागण्या वाढतच होत्या. ते पाहून श्रावणीने विरोध दर्शवल्यावर तिचा शारीरिक, मानसिक छळ सुरू झाला.
क्रौर्याची परिसीमा म्हणजे श्रावणीला सासूने एवढी मारहाण केली, की अजूनही श्रावणीच्या अंगावर जागोजागी चावल्याच्या आणि मारहाणीच्या खुणा आहेत.
माहेरहून पैसे मिळायचे बंद झाल्यावर आंबेकर कुटुंबीयांनी श्रावणीला घराबाहेर काढले. शेवटी मंगळसूत्र विकून मिळालेल्या पैशातून तिने माहेर गाठले.

Web Title: Dowry shortage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.