Join us

खेरवाडी येथे दोन मुलांसह दाम्पत्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 06:11 IST

कफ परेड येथे एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या करण्याची घटना ताजी असतानाच

मुंबई : कफ परेड येथे एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या करण्याची घटना ताजी असतानाच वांद्रे (पूर्व) येथील खेरवाडी परिसरातील एका दाम्पत्याने दोन तरुण मुलांसह जीवन संपविल्याची घटना शनिवारी दुपारी उघडकीस आली. कर्जामुळे चतुर्थ श्रेणी कर्मचारी राजेशभिंगारे (५२), त्यांची पत्नी अश्विनी (४५) व मुले तुषार (२३) आणि गौरांग (१९) यांनी झुरळ मारण्याचे औषध प्राशन करुन आत्महत्या केली.राजेश भिंगारे हे वांद्रे रेशनिंग कार्यालयात शिपाई म्हणून कार्यरत होते. मृत्यूपूर्वी त्यांनी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना मिळाली असून कर्जबाजारीपणामुळे हे कृत्य करीत असल्याचे त्यात नमूद केले आहे.भिंगारे कुटुंब वांद्रे शासकीय वसाहतीत राहात होते. त्यांची दोन्ही मुले महाविद्यालयात शिकत होती. शनिवारी दुपारपर्यंत त्यांच्या घरातून कोणी बाहेर आले नव्हते, त्यामुळे शेजारच्या महिलेने त्यांच्या घराचा दरवाजा ढकलला असता आत भिंगारे दाम्पत्य व दोन्ही मुले बेशुद्धावस्थेत पडल्याचे आढळले. त्यांनी पोलिसांना कळविल्यानंतर त्यांनी चौघांना सायन रुग्णालयात नेले, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. .भिंगारे यांनी काही जणांकडून लाखांच्या घरात कर्जाऊ रक्कम घेतलेली होती. कर्ज फेडणे अशक्य असल्याने काही दिवसांपासून ते तणावाखाली होते. त्यामुळे चौघांनी आयुष्याचा शेवट करुन कर्जबाजारातून सुटका करण्याचे ठरविले असावे, असा पोलिसांचा कयास आहे. त्यांच्यावरील कर्जाबाबतचा नेमका तपशील शेजाऱ्यांकडून घेण्यात येत आहे.