मुंबईत डझनभर कावळ्यांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:17 AM2021-01-08T04:17:20+5:302021-01-08T04:17:20+5:30
बर्ड फ्लूची शक्यता? लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : महाराष्ट्रात बर्ड फ्लू नाही, असे सरकार सांगत असले तरीदेखील गेल्या १५ ...
बर्ड फ्लूची शक्यता?
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महाराष्ट्रात बर्ड फ्लू नाही, असे सरकार सांगत असले तरीदेखील गेल्या १५ दिवसांपासून चेंबूर येथील कलेक्टर कॉलनी परिसरात डझनभर कावळ्यांचा मृत्यू झाला आहे. कावळ्यांचा मृत्यू बर्ड फ्लूने झाला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, बुधवारी ठाणे येथेही सुमारे १५ बगळ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती; आणि हे मृत्यूदेखील बर्ड फ्लूने झाले असावेत, अशी शंका व्यक्त केली जात आहे.
चेंबूर येथील पर्यावरण रक्षक प्रमोद नाईक यांनी याबाबत सांगितले की, गेल्या १५ दिवसांपासून येथे कावळ्यांचा मृत्यू होत आहे. कधी एक, कधी दोन तर कधी पाच असे कावळ्यांचे मृत्यू होत आहेत. रोज पाच - सहा, पाच - सहा कावळे मरत आहेत. येथील कावळ्यांचे मृत्यू होत असल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या नियंत्रण कक्षाला दिली. तसेच समाज माध्यमावरदेखील याबाबत माहिती दिली. मंत्र्यांना टॅग केले. मात्र काही झाले नाही. मी पुन्हा नियंत्रण कक्षाला फोन केला. तेव्हा त्यांनी माझी तक्रार लिहून घेतली. गुरुवारी रात्री महापालिकेचे काही कर्मचारी येथे येऊन गेले. त्यांनी कार्यवाही केली नसली तरी त्यांनी एका अधिकऱ्यांशी बोलणे करून दिले. मात्र आता जे कावळे मेले आहेत त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे होत आहे? याबाबत काम करणे गरजेचे आहे.