मुंबई : ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे डझनभर नेते शिवसेना-भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या अफवेनेच गुरुवारची सकाळ उजाडली खरी; मात्र राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर वगळता इतरांनी पक्षांतराच्या चर्चेचा इन्कार केला. अहिर यांनी मात्र ११ वाजता ‘मातोश्री’वर जाऊन शिवबंधन बांधले.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेते भाजपच्या मार्गावर असल्याचे विधान नुकतेच केले आहे. तेव्हापासून अनेकांच्या नावाची चर्चा रंगू लागली आहे. त्यातच शिवेंद्रराजे भोसले (सातारा), वैभव पिचड (अकोले), संग्राम जगताप (अहमदनगर शहर) आणि राणा जगजितसिंह पाटील (उस्मानाबाद) हे राष्ट्रवादीचे आमदार विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांच्या मुलाखतीसाठी न गेल्याने त्यांच्या भाजप वा शिवसेना प्रवेशाची चर्चा सुरू झाली.
त्यावर मीही अशा मुलाखतीला कधी गेलेलो नव्हतो. पण आता ही चूक दुरुस्त केली जाईल. मुलाखतीला आले नाहीत म्हणून आमदार नाराज आहेत, असे म्हणणे चुकीचे आहे. ते पक्षासोबतच आहेत, असा खुलासा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.
वैभव पिचड हे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचे पुत्र आहेत. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वर्षा निवासस्थानी भेटले. त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला ऊत आला. शिवेंद्रराजे भोसले यांचे साताराचे खासदार उदयनराजे भोसले यांच्याशी राजकीय वैर सर्वश्रुत आहे. शिवेंद्रराजे यांना पक्षात घेण्याचे प्रयत्न भाजपचे काही नेते करीत आहेत.
संग्राम जगताप यांनी अलीकडे लोकसभेची निवडणूक लढविली; पण त्यांचा दारुण पराभव झाला होता. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे संग्राम हे जावई आहेत. राणा जगजितसिंह यांनीही लोकसभा निवडणूक लढविली; पण त्यांचाही पराभव झाला होता. अक्कलकोटचे काँग्रेस आमदार सिद्धराम मेहेत्रे हे भाजपच्या वाटेवर असल्याचे बोलले जाते. मध्यंतरी ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले होते. मुख्यमंत्री काही दिवसांपूर्वी सोलापूर दौऱ्यावर गेले तेव्हा मेहेत्रे त्यांच्या स्वागतासाठी गेले होते.
अहिर यांना शिवबंधन; आदित्य ठाकरे वरळीतून?राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री सचिन अहिर यांनी आज ‘मातोश्री’वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हातून शिवबंधन बांधून घेत शिवसेनेत प्रवेश केला. अहिर शिवसेनेत आल्याने युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे आगामी विधानसभा निवडणूक वरळी मतदारसंघातून लढणार असल्याची चर्चा आहे. सध्या या मतदारसंघात शिवसेनेचे सुनील शिंदे हे आमदार आहेत.