मुंबई : गेल्या वर्षी जुलै महिन्यात राज्यात ११० वर्षे जुन्या असलेल्या कॉलेज ऑफ फिजिशियन अँड सर्जन (सीपीएस) या वैद्यकीय शिक्षण देणाऱ्या संस्थेची राज्यात शिकविल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमांची मान्यता वैद्यकीय शिक्षण विभागाने रद्द केली होती. त्या संस्थेच्या अध्यक्षपदी छत्रपती संभाजीनगर येथील नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. अजय सांबरे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. गिरीश मैंदरकर यांचा दहा वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने ते स्वतःहून या पदावरून बाजूला झाले. त्यानंतर या संस्थेच्या २४ सदस्यांच्या कार्यकारिणीने एकमताने डॉ. सांबरे यांची निवड केली.
काही महिन्यांपासून राज्यात पुन्हा सीपीएसमार्फत घेण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमांना मान्यता मिळावी म्हणून प्रयत्न केले जात आहेत. सध्या हे प्रकरण कोर्टात असून, न्यायप्रविष्ट आहे. राज्यात दरवर्षी सर्वसाधारण ९,५०० विद्यार्थी एमबीबीएस करून बाहेर पडतात. सध्याचा कल पाहता प्रत्येक विद्यार्थ्याला पदव्युत्तर शिक्षण घ्यायचे असते.
राज्यात सध्याच्या घडीला पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या ३,५०० जागा आहेत. त्यातही ऑल इंडिया कोटा असल्यामुळे देशभरातून विद्यार्थी या जागेसाठी मेरिटनुसार प्रवेश घेत असतात. त्यामुळे राज्यात एमबीबीएस उत्तीर्ण झालेल्या सगळ्याच मुलांना प्रवेश मिळत नाही. त्यातील काही विद्यार्थी पुन्हा नीटची परीक्षा देतात. काही विद्यार्थी सीपीएस येथील पदविका अभ्यासक्रमाला मेरिटनुसार प्रवेश घेत असतात. गेल्या अनेक वर्षांपासून ही पद्धत सुरू आहे.
महाराष्ट्रात १२५ खासगी आणि आरोग्य विभागाच्या अखत्यारीतील रुग्णालयात १,२०० विद्यार्थी शिकतात. सीपीएसची मान्यता रद्द केल्यामुळे १,२०० विद्यार्थ्यांना आता या पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश घेता आलेला नाही. डॉ. सांबरे गेली २० वर्षे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी नेत्ररोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. त्यासोबत त्यांनी सीपीएस संस्थेत उपाध्यक्षपद भूषविलेले आहे.