Join us  

डॉ. आंबेडकर, राजर्षी शाहू यांचे माणगावला स्मारक; मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2024 9:01 AM

विवेक विचार मंचातर्फे चौथ्या राज्यस्तरीय सामाजिक न्याय परिषद २०२४चे रविवारी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृह येथे आयोजन करण्यात आले होते.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : स्वराज्याबरोबर सुराज्य निर्माण करणे तसेच रयतेचे राज्य आणण्याचे काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केले. त्यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून राजर्षी शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हे काम पुढे अविरत सुरू ठेवले. माणगाव (जि. रायगड) येथे राजर्षी शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संयुक्त स्मारक उभारण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारीमुंबईत केली.

विवेक विचार मंचातर्फे चौथ्या राज्यस्तरीय सामाजिक न्याय परिषद २०२४चे रविवारी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृह येथे आयोजन करण्यात आले होते. कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा, कौशल्य विकास राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष किशोर मकवना, बार्टीचे महासंचालक डॉ. सुनील वारे आदी उपस्थित होते.

सर्व 'आयटीआय'मध्ये संविधान मंदिर : लोढाकौशल्य विकास विभागांतर्गत औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील अनुसूचित जातीच्या १५० विद्यार्थ्यांना स्टार्टअप सुरू करण्यासाठी १ ते ५ लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत करून देण्यात येईल, असे कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी यावेळी सांगितले. कौशल्य विकास विभागांतर्गत असणाऱ्या ४३८ औद्योगिक प्रशिक्षण संस्था तसेच ७० तांत्रिक शिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये संविधान मंदिराची निर्मिती करण्यात येणार असल्याची घोषणाही मंत्री लोढा यांनी यावेळी केली.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या सर्वोच्च राज्यघटनेला अनुसरून आपण काम करीत आहोत. राज्यातील युवक बेरोजगार राहणार नाही, यासाठी मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजना, कौशल्य विकास योजना तसेच स्टार्टअपसारख्या योजना राज्यात प्रभावीपणे राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :मुंबईएकनाथ शिंदे