मुंबई - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 61 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भीमसैनिक मुंबईत दाखल झाले आहेत. चैत्यभूमीला भीमसागराचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
राज्यपाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन. दरम्यान, यावेळी इंदू मिलमधील बाबासाहेबांच्या स्मारकाच्या प्रत्यक्ष कामाला महिनाभरात सुरुवात होईल, टेंडर निघालं आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
70 शाळांमध्ये अनुयायांची व्यवस्था
ओखी वादळामुळे मुंबईत पावसाची रिपरिप असली तरीही भीमसैनिक मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. पाऊस सुरू झाल्याने महापालिकेच्या ७० शाळांमध्ये अनुयायांची व्यवस्था करण्यात आली. येथे वैद्यकीय तपासणीची सुविधा आहे. दादर रेल्वे स्थानकावर उतरणा-या अनुयायींना विनाशुल्क बेस्ट बसद्वारे उपलब्ध शाळांमध्ये नेण्यात येत होते. महापालिकेचे २४ विभागीय नियंत्रण कक्ष सतर्क ठेवण्यात आले असून आवश्यक ते मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. वैद्यकीय सेवेच्या रुग्णवाहिका तत्पर ठेवण्यात आल्या आहेत. धारावी, माटुंगा लेबर कॅम्प, दादर, नायगाव, परेल, माहीम, खेरवाडी येथील शाळा, समाज मंदिरातही अनुयायांची व्यवस्था करण्यात आली.