मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती यंदा डिजिटल पद्धतीने साजरी केली जाणार आहे. आपापल्या घरात समतेचा दिवा पेटवून बाबासाहेबांना आदरांजली अर्पण करावी. त्यानंतर वाचन, सोशल मीडियाच्या माध्यमातून आॅनलाइन पद्धतीने चर्चासत्रे, भाषणे आणि भीमगीतांचे कार्यक्रम साजरे केले जावेत, त्यांचा आस्वाद घ्यावा. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोठेही सोशल डिस्टंसिंगला तडा जाणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन राजकीय आणि सामाजिक नेत्यांकडून केला जात आहे.
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी यापूर्वीच डिजिटल जंयतीला सुरूवात केली आहे. ‘उत्सव बहुजन नायकांचा, ज्योतिबा भीमरावांचा’ या नावाने ९ एप्रिलपासूनच आॅनलाइन जयंती उत्सव सुरू करण्यात आला आहे. यात जलसा-महाजलसा, भीमगीते, विविध विषयांवर भाषणे- उद्बोधन केली जात आहेत. तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जनतेला शुभेच्छा देतानाच जयंती यंदा ‘डिजिटल’ माध्यमातून साजरी करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.