लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार पुन्हा सत्तेत आले तर संविधान बदलणार असा अपप्रचार विरोधकांकडून सुरू आहे. मात्र पंतप्रधान मोदी यांनीच २६ नोव्हेंबर हा संविधान दिन घोषित केला आहे. त्यानुसार राज्यात आणि देशात हा दिवस साजरा होत आहे. त्यामुळे कुणी कितीही प्रयत्न केले तरी संविधान बदलणे अशक्य असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री शिंदे यांनी रविवारी दादर येथील चैत्यभूमीवर महामानवाला अभिवादन केले. त्याचप्रमाणे चैत्यभूमीच्या आवारात भरवलेल्या प्रदर्शनाला भेट दिली. या वेळी ते म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या संविधानाला अनुसरून राज्याचा कारभार सुरू आहे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, असा संदेश बाबासाहेबांनी सर्वांना दिला आहे. शासनानेही इंदू मिलच्या जागी भव्य स्मारक उभे करायला सुरुवात केली आहे, या वेळी राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, ज्येष्ठ आरपीआय नेते अविनाश महातेकर, नागसेन कांबळे आदी उपस्थित होते.