मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत पुस्तक रुपाने जी काही साहित्य संपदा उपलब्ध आहे किंवा बाबासाहेबांचा इतिहास जो चरित्र रुपात लिहिलेला आहे. तथापि, त्यामध्ये बाबासाहेबांचा पूर्ण इतिहास नाही. जर संपूर्ण बाबासाहेब समजून घ्यायचे असतील तर नव्याने बाबासाहेबांचे सखोल आणि विस्तृत स्वरुपात चरित्र लेखन करण्याची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक राजा ढाले यांनी केले. मुंबई विद्यापीठातर्फे क्रांतीज्योती ज्योतिराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहात ‘विद्यार्थी दशेतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर’ या विषयावरील व्याख्यानात ढाले म्हणाले की, बाबासाहेबांबद्दल सांगितलेला आणि लिहिलेला इतिहास हा बराच लुप्त स्वरुपात असल्याने खऱ्या इतिहासापासून अनेक जण वंचित आहेत. अशा सर्व घटकांपर्यंत बाबासाहेब पोहचणे गरजेचे आहे. कारण बाबासाहेब हे कोणत्या एका जातीचे किंवा धर्माचे नव्हते तर ते सर्वसमावेशक एक महामानव होते. बाबासाहेबांचा अलिखित इतिहास संशोधक आणि चिकित्सक वृत्तीने समाजापुढे मांडला गेला पाहिजे. त्याचबरोबर त्याचे चिकित्सक विश्लेषण आणि पुनसंशोधन करुन विस्तृत स्वरुपात ते लिखित स्वरुपात आणण्याची गरज त्यांनी विशद केली. विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांच्या जीवनकार्यावर रितसर संशोधन करुन बाबासाहेबांचे विविध पत्रे, त्यांचा पत्रव्यवहार, त्यांची भाषणे व लेखन तसेच जगातील उपलब्ध असलेली साहित्यसंपदा यांचा आढावा घेऊन खोटा इतिहास पुसून नवीन पुर्नशोधित इतिहास मांडण्याचे आव्हानही त्यांनी यावेळी केले. चांगले लिहिले नाही तर वाईट लिहिणाऱ्यांचे पेव फुटत असून त्यांचे फावत असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे अधिकाअधिक संशोधक आणि चिकित्सकवृत्तीने लिहिणे ही काळाची गरज असून यावर समाजातील सर्वच स्तरातून प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. या व्याख्यानमालेचे सत्र अध्यक्षपद प्रा. डॉ. गौतम गवळी यांनी भूषविले. (प्रतिनिधी)
डॉ. आंबेडकरांचा इतिहास नव्याने पुस्तक रूपात यावा
By admin | Published: April 13, 2017 3:08 AM