Join us

डॉ. आंबेडकरांचे अर्थशास्त्राबाबतचे लेखन द्रष्टेपणाचे - शरद पवार

By संजय घावरे | Published: October 21, 2023 10:22 PM

बाबासाहेबांनी लिहिलेल्या ‘द प्रॅाब्लेम ऑफ द रूपी' या ग्रंथाच्या शतकपूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात पवार बोलत होते.

मुंबई : अर्थशास्त्राबाबत स्पष्ट नीती व भूमिका मांडणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या ‘द प्रॅाब्लेम ऑफ द रूपी’ या ग्रंथाची नोंद जगातल्या अनेक अर्थशास्त्रज्ञांनी घेतली. काहींनी त्याला मान्यता दिली नाही तरीही बाबासाहेबांचे विचार आणि लिखाण दूरदर्शी ठरले. त्यामुळे बाबासाहेबांचे अर्थशास्त्राबाबतचे लेखन आजही अतिशय महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केेले. बाबासाहेबांनी लिहिलेल्या ‘द प्रॅाब्लेम ऑफ द रूपी' या ग्रंथाच्या शतकपूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात पवार बोलत होते.

‘द प्रॅाब्लेम ऑफ द रूपी’ या ग्रंथाच्या शतकपूर्ती यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, ॲड. प्रकाश आंबेडकर, लीना तामगाडगे, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष व चित्रपट निर्माते नितीन वैद्य आदी मान्यवर उपस्थित होते. पवार पुढे म्हणाले की, बाबासाहेबांनी अर्थशास्त्राबाबत केलेले लिखाण अतिशय महत्त्वाचे आहे. त्यांच्या 'द प्रॉब्लेम ऑफ द रुपी' प्रबंधाला जगातील अनेक देशांनी मान्यता दिली. स्वातंत्र्यपूर्व काळातील सरकारने बाबासाहेबांवर एक जबाबदारी सोपविली होती. पाणी आणि पाटबंधाऱ्यासंबंधी महत्त्वपूर्ण निर्णय त्यांनी घेतले. त्यांनी भाक्रा-नांगल धरण बांधण्याचा निर्णय घेतल्याने पंजाब-हरियाणा ही राज्ये अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण झाली. या प्रकल्पापासून विद्युतनिर्मितीहील करण्यात आली. 'द प्रॅाब्लेम ऑफ द रूपी' या ग्रंथात त्यांनी सोने आणि चलन किंवा चांदी आणि चलन या संबंधांवर लेखन केल्याचेही पवार म्हणाले.

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ब्रिटिश भारताला कसे लुटताहेत या संदर्भात बाबासाहेबांनी लिखाण केले. ते करत असताना त्यांनी भारतातल्या अनेक प्रश्नांचा उल्लेख केला. रुपयाची किंमत जर स्थिर राहिली तर या देशातील गरिबी थांबू शकते आणि गरिबांची आर्थिक परिस्थिती बदलू शकते. याबाबत त्यांनी काही सूचना केल्या होत्या ज्या 'द प्रॅाब्लेम ऑफ द रूपी' या ग्रंथामध्ये आहेत. या ग्रंथाला १०० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त एक महत्त्वपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचा आनंद आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत सहा सत्रांमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यातील विविध सत्रांमध्ये वेगवेगळ्या मान्यवरांची भाषणे झाली.

टॅग्स :शरद पवारप्रकाश आंबेडकर