गेल्या काही दिवसापासून राजकीय वर्तुळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खासदार डॉ.अमोल कोल्हे नाराज नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. डॉ. कोल्हे हे काही दिवसापासून राष्ट्रवादीच्या कार्यक्रमांना गैरहजर असतात, तसेच गुजरात विधानसभा निवडणुकी दरम्यान राष्ट्रवादीने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली होती, या यादीत खासदार डॉ.अमोल कोल्हे यांचे नाव वगळण्यात आले होते. यावरुन राजकीय वर्तुळात अमोल कोल्हे राष्ट्रवादीवर नाराज असल्याच्या चर्चे सुरू होत्या. यावर आज राष्ट्रवादीचे नेते आमदार दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.
'खासदार डॉ. अमोल कोल्हे हे राष्ट्रवादीध्ये नाराज नाहीत, ते सतत आमच्या संपर्कात आहेत. ते आमच्याशी चर्चा करत असतात. आम्ही या दोन्ही लोकसभेच्या जागा राखणार आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
' लोकसभेची उमेदवारी अमोल कोल्हे यांनी देण्याचा निर्णय हाय कमांडचा आहे. अमोल कोल्हे हे नाराज नाहीत, ते आमच्या सतत संपर्कात आहेत, असंही दिलीप वळसे पाटील म्हणाले.
गुजरात विधानसभा निवडणुकी दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली होती. या यादीत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील, छगन भुजबळ, फौजिया खान यांच्यासह ३१ जणांचा समावेश करण्यात आला होता. पण, यामध्ये खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा कुठेही उल्लेख करण्यात आला नव्हता. यामुळे कोल्हे नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या.
तसेच २०१९ मध्ये खासदार अमोल कोल्हे यांनी शिवस्वराज्य यात्रा काढून सुमारे १०० मतदारसंघ पिंजून काढले होते. शिवाय, त्यांच्या वक्तृत्वामुळे लोकांचाही राष्ट्रवादीला वाढता पाठिंबा मिळाला असल्याचे समोर आले होते. त्यामुळे राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकांमध्ये त्यांना गणले जाऊ लागले होते. मात्र, आता स्टार प्रचारकांच्या यादीतून त्यांचे नाव वगळण्यात आल्यामुळे कोल्हेंच्या नाराजीची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.