डॉ. अमरापूरकर मृत्यूप्रकरण - राज्य सरकार, महानगरपालिकेला नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2017 05:51 AM2017-09-02T05:51:50+5:302017-09-02T05:52:43+5:30
एलफिन्स्टन रोड जंक्शनजवळच्या उघड्या मॅनहोलमध्ये पडून बॉम्बे हॉस्पिटलचे प्रसिद्ध पोटविकारतज्ज्ञ डॉ. दीपक अमरापूरकर यांचा मृत्यू झाला. एका वरिष्ठ डॉक्टरच्या मृत्यूमुळे आम्हालाही दु:ख वाटत आहे
मुंबई : एलफिन्स्टन रोड जंक्शनजवळच्या उघड्या मॅनहोलमध्ये पडून बॉम्बे हॉस्पिटलचे प्रसिद्ध पोटविकारतज्ज्ञ डॉ. दीपक अमरापूरकर यांचा मृत्यू झाला. एका वरिष्ठ डॉक्टरच्या मृत्यूमुळे आम्हालाही दु:ख वाटत आहे. मात्र आम्ही जनहित याचिकेत गुन्हा नोंदविण्याचा किंवा नुकसानभरपाई देण्याचा आदेश देऊ शकत नाही, असे स्पष्ट करत उच्च न्यायालयाने उघड्या मॅनहोलसंदर्भात राज्य सरकार व मुंबई महापालिकेला गुरुवारी नोटीस बजावली. तसेच या याचिकेवर दोन आठवड्यांत उत्तर देण्याचे निर्देश दिले.
डॉ. दीपक अमरापूरकर यांचा एलफिन्स्टन येथील एका उघड्या मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाला. या प्रकरणी पालिका आयुक्त व संबंधित अधिकाºयांवर निष्काळजीपणाचा गुन्हा नोंदविण्यात यावा, अशी मागणी करणारी जनहित याचिका ‘फेडरेशन आॅफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशन’ यांनी उच्च न्यायालयात दाखल केली. तसेच मुख्य सचिव, पालिका, महापालिका आयुक्त आणि अन्य संबंधित अधिकाºयांनी ५० लाखांची नुकसानभरपाई द्यावी, अशी विनंतीही व्यापारी संघटनेने केली आहे.
या याचिकेवरील सुनावणीत उच्च न्यायालयाने नुकसानभरपाई देण्याचा व संबंधितांवर गुन्हा नोंदविण्याचा आदेश देण्यास नकार दिला. डॉ. अमरापूरकर यांच्यासारख्या उत्तम डॉक्टरांचा असा अंत व्हावा, हे पाहून आम्हालाही दु:ख झाले आहे. मात्र जनहित याचिकेच्या काही मर्यादा आहेत. आयपीसीच्या कलम ३०४ (भाग -२) अंतर्गत नुकसानभरपाईचे आम्ही आदेश देऊ शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
या केसमध्ये पीडित व्यक्तीचे कुटुंब गरीब किंवा अशिक्षित नाही, असे म्हणत न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी दोन आठवडे तहकूब केली. मात्र याचिकाकर्त्यांनी उपस्थित केलेल्या अन्य मुद्द्यांबाबत उत्तर देण्यासाठी न्यायालयाने राज्य सरकार व महापालिकेला नोटीस बजावली. तसेच उत्तर देण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत दिली.समिती नेमण्याची मागणी
उघड्या असलेल्या मॅनहोलजवळ पालिकेने साईनबोर्ड न लावल्याने एका प्रसिद्ध डॉक्टरचा मृत्यू झाला, असे व्यापारी संघटनेने याचिकेत म्हटले आहे. सध्या मुंबईत अस्तित्वात असलेल्या मॅनहोल्सची पाहणी करण्यासाठी व मॅनहोल्ससंदर्भात सूचना देण्यासाठी माजी सनदी अधिकारी व तांत्रिकांची समिती नेमावी, अशी विनंती या व्यापारी संघटनेने जनहित याचिकेद्वारे केली आहे.पालिकेकडून १५ दिवसांत अहवाल
डॉ. अमरापूरकर मृत्यूप्रकरणाची चौकशी अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल (पूर्व उपनगरे) यांच्यामार्फत होणार आहे. या चौकशीचा अहवाल १५ दिवसांमध्ये सादर करण्याचे आदेश पालिका आयुक्त अजय मेहता यांनी दिले आहेत.
शिवाजी पार्क
स्मशानभूमीत अंत्यसंस्कार
डॉ. अमरापूरकर यांच्या पार्थिवावर गुरुवारी दुपारी शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांची बहीण मनीषा यांनी अंत्यविधी पार पाडला. डॉक्टर अमरापूरकर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. मात्र दोन्ही मुले अमेरिकेत असल्याने ती अंत्यसंस्कारावेळी उपस्थित नव्हती. वैद्यकीय क्षेत्रातील डॉ. अमरापूरकर यांचे सहकारी आणि तज्ज्ञ डॉक्टर अंत्यसंस्काराला हजर होते.