डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी याच टेबलवर तासन् तास केली ज्ञानतपस्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 05:58 AM2022-04-14T05:58:54+5:302022-04-14T06:13:05+5:30

राज्यघटनेचे शिल्पकार व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समग्र जीवन प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहेच,  शिवाय त्यांचा वावर जिथे जिथे झाला, तेही बाबासाहेबांच्या परिस स्पर्शाने, सहवासाने अमूल्य, अजरामर ठरले आहे.

Dr Babasaheb Ambedkar did study for hours at the same table | डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी याच टेबलवर तासन् तास केली ज्ञानतपस्या

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी याच टेबलवर तासन् तास केली ज्ञानतपस्या

googlenewsNext

समीर परांजपे

मुंबई :

राज्यघटनेचे शिल्पकार व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समग्र जीवन प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहेच,  शिवाय त्यांचा वावर जिथे जिथे झाला, तेही बाबासाहेबांच्या परिस स्पर्शाने, सहवासाने अमूल्य, अजरामर ठरले आहे. प्रत्येक पिढीला नवी ऊर्जा देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईच्या दादर पूर्व येथील हिंदू कॉलनीत ‘राजगृह’ हे निवासस्थान आहे. बाबासाहेबांच्या नित्य वापरातल्या वस्तू, त्यांच्या ग्रंथसंग्रहातील काही पुस्तके, त्यांच्या संसारातील भांडी, त्यांची निवडक छायाचित्रे अशा ऐतिहासिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाच्या वस्तूंचे एक संग्रहालय राजगृहच्या तळमजल्यावरील काही खोल्यांमध्ये आंबेडकर कुटुंबीयांनी साकारले आहे. डॉ. आंबेडकर यांच्या महान जीवनाचे पैलू समजून घेण्यासाठी हे वस्तुसंग्रहालय मोलाची कामगिरी बजावते. 

कुठे आहे परळमधील घर?
मुंबईतील परळ भागात दामोदर नाट्यगृहाशेजारी ज्या बीआयटी चाळी आहेत, त्यातील चाळ क्र. १ मधील खोली क्रमांक ५० व ५१ अशा दोन खोल्यांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे पूर्वी राहत असत.
- ही जागा त्यांचा ग्रंथसंग्रह व परिवारासाठी अपुरी पडू लागल्यानंतर त्यांनी १९३० मध्ये हिंदू कॉलनीमध्ये दोन प्लॉट खरेदी केले.
- त्यातील एका प्लॉटवर १९३१ रोजी राजगृहाचे सुरू झालेले बांधकाम १९३३ साली पूर्ण झाले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहवासाने, स्पर्शाने पावन झालेल्या वस्तूंचा ऐतिहासिक ठेवा 
डॉ. आंबेडकर व त्यांच्या पत्नी रमाबाई यांच्या संसारातील तांबे, पितळेची अनेक भांडी, बाबासाहेब वापरत असलेल्या काठ्या, त्यांचा चष्मा अशा अनेक गोष्टी या संग्रहालयात पाहायला मिळतात. राजगृहमध्ये डॉ. आंबेडकरांना भेटायला येणाऱ्या अभ्यागतांसाठी असलेली खोली पूर्वीसारखीच जतन करून ठेवण्यात आली आहे.

बाबासाहेबांचे बुक शेल्फ, दुर्मीळ छायाचित्रे
राजगृहमधील वस्तुसंग्रहालयाची देखरेख करणारे उमेश कसबे यांनी सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नित्य वापरातील बुक शेल्फ, टेबल, खुर्च्या, ड्रेसिंग टेबल, गिझर, अंघोळ करण्याचा विदेशातून आणलेला टब, दोन पात्यांचा पंखा अशा ऐतिहासिक मोल असणाऱ्या वस्तू या संग्रहालयात आहेत. त्यांनी सुरू केलेल्या विविध नियतकालिकांच्या अंकांची, बाबासाहेबांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या प्रसंगांची छायाचित्रे येथे आहेत.

वैयक्तिक वापरातील वस्तू
डॉ. आंबेडकर यांच्या वैयक्तिक वापरातील वस्तूंचे दर्शन घेऊन लोक हरखून जातात. अनेकांना बाबासाहेबांच्या प्रगाढ विद्वत्तेविषयी माहिती असते; पण या महान विभूतीचे सांसारिक दर्शनही संग्रहालयातून होते. या संग्रहालयात मांडलेले सर्व फर्निचर बर्मा टिकवूडचे असून, ते बाबासाहेबांनी पसंतीनुसार बनवून घेतले होते.

अस्थिकलशाचे घ्या दर्शन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अस्थिकलश या वस्तुसंग्रहालयात दर्शनासाठी ठेवण्यात आला आहे.



डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दिल्लीमध्ये निधन झाले. त्यांचे पार्थिव मुंबईला राजगृहमध्ये आणल्यानंतर ते ज्या पलंगावर ठेवले, तो पलंगही या वस्तुसंग्रहालयात पाहायला मिळतो.

कधी पाहता येईल?
‘राजगृह’मधील डॉ. आंबेडकर वस्तुसंग्रहालय दर मंगळवारी बंद असते. मात्र, आठवड्याच्या 
अन्य दिवशी हे संग्रहालय सर्वांसाठी सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत खुले असते.

कुठे? 
राजगृह, हिंदु कॉलनी, दादर पूर्व, मुंबई | या वास्तुची रचना वैशिष्ट्यपूर्ण, तितकीच वस्तुसंग्रहालयातील वस्तूंची मांडणीही. 

महामानवाचे सर्वंकष दर्शन घडविणारे हे वस्तुसंग्रहालय प्रत्येकाने आवर्जून पाहण्यासारखे आहे. त्यातून आपल्याला नक्कीच प्रेरणा मिळेल. 

(सर्व छायाचित्र: दत्ता खेडेकर)

Web Title: Dr Babasaheb Ambedkar did study for hours at the same table

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.