मुंबई विद्यापीठात साकारत आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2020 05:34 PM2020-04-19T17:34:14+5:302020-04-19T17:34:46+5:30

विविध पदव्युत्तर व प्रमाणपत्र अभ्यासक्रम राबविले जाणार    

Dr. Babasaheb Ambedkar International Research Center is studying at Mumbai University | मुंबई विद्यापीठात साकारत आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र

मुंबई विद्यापीठात साकारत आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र

googlenewsNext

 

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२९ व्या जयंतीचे औचित्य साधून मुंबई विद्यापीठात ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल रिसर्च सेंटर फॉर सोशल जस्टिस’ हे नवे संशोधन केंद्र येत्या शैक्षणिक वर्षापासून (२०२०-२०२१) सुरु केले असून त्यासाठी मुंबई विद्यापीठाने रुपये १ कोटीची अर्थसंकल्पीय तरतूद केली आहे. तसेच इंग्लंड मधील आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या संस्थेतील दक्षिण आशियाई केंद्रात डॉ. ‘बाबासाहेब आंबेडकर व्हिजिटींग फेलो’ या उपक्रमासाठी महाराष्ट्र शासनाने देखील रुपये १८ कोटींची तरतूद केलेली आहे. त्या अनुषंगाने या केंद्राचे सहाय्य डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्रास मिळणार आहे, असे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांनी स्पष्ट केले.
 
सामाजिक न्याय आणि मानव्यविद्या या अभ्यास क्षेत्रांसाठी मार्गदर्शक ठरतील अशी ‘ध्येयधोरणे आणि विकासाची दिशा’ यांसंदर्भातील संशोधनावर लक्ष केंद्रीत केले  जाणार आहे. त्यादृष्टीने राज्यातील तसेच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधनकेंद्रांशी जोडून घेत विविध पदव्युत्तर व प्रमाणपत्र अभ्यासक्रम येथे राबविले जाणार आहेत. ‘आंबेडकरी विचार आणि तत्त्वज्ञान’ या विषयांत एम.ए. व पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाची सोय असून  त्याच बरोबर ‘डेव्हलपमेंट स्टडीज ऍण्ड सोशल पॉलिसी’ आणि  बुद्धिस्ट स्टडीज’ या विषयांत सुद्धा एम. ए. करण्याची संधी विद्यार्थांना मिळणार आहे. याच निमित्ताने विविध ‘सामाजिक शास्त्रे आणि मानव्यविद्या’ आदी विषयांतही आंतरशाखीय संशोधनाची संधी उपलब्ध करून देत आंतरराष्ट्रीय स्तरावरील उत्तम दर्जाचे संशोधनकेंद्र म्हणून हे केंद्र उभे करण्याचा मुंबई विद्यापीठाचा मानस आहे. असे मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्राच्या उभारणीसाठी मुंबई विद्यापीठाने हिरीरीने पुढाकार घेतला असून या संशोधनकेंद्राची स्वतंत्र इमारत असावी  यादृष्टीने  विद्यापीठ नियोजन करीत असल्याचे प्रा. कुलकर्णी यांनी म्हटले आहे.

लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या दक्षिण आशियाई केंद्रातील  डॉ.बाबासाहेब आंबेडकर व्हिजिटींग फेलो या उपक्रमामार्फत एकत्रितपणे आंतरराष्ट्रीय कार्यशाळा, परिषदा, चर्चासत्रांचे आयोजन तसेच विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यासाठी  संशोधन शिष्यवृत्ती  असे उपक्रम आयोजित केले जातील, अशी माहिती या केंद्राचे समन्वयक प्रा. मृदूल निळे यांनी दिली. तर  डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे मौलिक विचार आणि तत्त्वज्ञान आंतरराष्ट्रीय संशोधकांपर्यंत पोचविण्यासाठी या संशोधन केंद्रामार्फत ऑनलाईन प्रमाणपत्र आणि पदविका अभ्यासक्रम देखील सुरु करण्याचा विचार मुंबई विद्यापीठ करीत असल्याची माहिती प्रकुलगुरू रवींद्र कुलकर्णी यांनी दिली.

-------------------------------------

जागतिक स्तरावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समाजदृष्टीवर संशोधन होत असताना मुंबई विद्यापीठानेही ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल रिसर्च सेंटर फॉर सोशल जस्टिस’ या संशोधनकेंद्राद्वारे सामाजिक न्याय व सामाजिक शास्त्रे या  अभ्यासक्षेत्रांत सखोल संशोधनास वाव देणारे आंतरराष्ट्रीय पातळीवरील  शैक्षणिक उपक्रम आयोजण्याचे ठरविले आहे.
डॉ सुहास पेडणेकर, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ

Web Title: Dr. Babasaheb Ambedkar International Research Center is studying at Mumbai University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.