डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती 'डिजिटल' साजरी होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2020 05:41 PM2020-04-13T17:41:41+5:302020-04-13T17:43:20+5:30
वाचन, आँनलाईन भाषण-चर्चासत्रे आणि गीतांचे आवाहन
मुंबई : भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती यंदा डिजिटल पद्धतीने साजरी केली जाणार आहे. आपापल्या घरात समतेचा दिवा पेटवून बाबासाहेबांना आदरांजली अर्पण करावी. त्यानंतर वाचन, सोशल मीडियाच्या माध्यमातून आँनलाइन पद्धतीने चर्चा सत्र, भाषणे आणि भीमगीतांचे कार्यक्रम साजरे केले जावेत, त्यांचा आस्वाद घ्यावा. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोठेही सोशल डिस्टंसिंगला तडा जाणार नाही, याची काळजी घ्यावी असे आवाहन राजकीय आणि सामाजिक नेत्यांकडून केला जात आहे. समाजातूनही त्याला चांगला प्रतिसाद दिला जात आहे.
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी यापूर्वीच डिजिटल जंयतीला सुरूवात केली आहे. 'उत्सव बहुजन नायकांचा , ज्योतिबा भीमरावांचा' या नावाने ९ एप्रिलपासूनच आँनलाइन जयंती उत्सव सुरू करण्यात आला आहे. यात जलसा-महाजलसा, भीमगीते , विविध विषयांवर भाषणे- उद्बोधन केली जात आहे. विशेष म्हणजे आँनलाइन जयंती कशी साजरी करावी, यावरही एक व्याख्यान झाले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जनतेला शुभेच्छा देतानाच जयंती यंदा ‘डिजिटल’ माध्यमातून साजरी करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. समाजातील दुर्बल, वंचित, उपेक्षित घटकांना बाबासाहेबांनी आत्मसन्मान व समानतेची संधी मिळवून दिली. ताठ मानेने जगण्याची ताकद दिली. ते त्यांच्या विचारांनी, कार्याने महामानव ठरले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उदारमतवादी विचारांचे, मानवतावादी शिकवणींचे पालन करुन देशहितासाठी, समाजाच्या भल्यासाठी आपण सर्वजण घरातच थांबून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करुया, त्यांना अभिवादन करुया. बाबासाहेबांना अभिवादन करतानाची छायाचित्रे, ध्वनिचित्रफिती समाजमाध्यमांवर टाकून त्यांच्याबद्दलचा आदर व कोरोनाविरुद्धच्या लढाईतील आपली एकजूट दाखवून देऊया, असे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.
तर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुस्तकांचे वाचन करुन घरातच जयंती साजरी करण्याचे आवाहन अन्न,नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.