डॉ. आंबेडकरांना ‘२२ प्रतिज्ञा अभियानांतर्गत’ अभिवादन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2019 01:57 AM2019-12-08T01:57:28+5:302019-12-08T01:57:47+5:30
१६ वर्षांपासून सुरू आहे उपक्रम
मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६३ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादनासाठी दादर येथील चैत्यभूमीवर दाखल नागरिकांच्या गळ्यातील आणि हातातील गंडे व दोरे कापून अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन करण्यात आले, शिवाय या वेळी याबाबत जनजागृती करण्यात आली. त्याचप्रमाणे, मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतील पत्रके, बॅनर्सच्या माध्यमातून तरुणांनी २२ प्रतिज्ञांची माहिती अनुयायांना दिली, तसेच त्यांच्यासोबत चर्चा करून त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सांगण्यात आले.
गेल्या १६ वर्षांपासून ‘२२ प्रतिज्ञा अभियान’ हा उपक्रम राबवत आहोत. तथाग गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार प्रत्येकाच्या घराघरांत पोहोचले पाहिजेत. डॉ. बाबासाहेबांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञांचे आचरण प्रत्येकाने केले पाहिजे. ज्यांच्या हातात गंडे-दोरे दिसले, ते आम्ही कापून डॉ. बाबासाहेबांचे विचार सांगण्याचे काम करीत आहोत व अंधश्रद्धा दूर करीत आहोत.
बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यास येणाऱ्या नागरिकांना वैज्ञानिकदृष्ट्या सक्षम करणे, त्यांना सतर्क करणे हे कार्य २२ प्रतिज्ञा अभियान करत असल्याचे प्रचारक विनोद पवार यांनी सांगितले.
अभिवादनासाठी अलोट गर्दी
मुंबई : चेंबूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी अनुयायांची रीघ लागली होती. रात्री उशिरापर्यंत येथे अनुयायी दाखल होत होते. पूर्व उपनगरातील चेंबूर, गोवंडी, शिवाजीनगर, मानखुर्द, चुनाभट्टी, कुर्ला व टिळकनगर येथील नागरिक येथे येत असतात.
आंबेडकर उद्यानात ५ डिसेंबरच्या रात्रीपासून मोठ्या प्रमाणात अनुयायी दाखल होत होते. महापौर किशोरी पेडणेकर यांनी बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. या वेळी माजी सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे, दक्षिण-मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे, प्रा. जोगेंद्र कवाडे, संगीता हंडोरे आदी उपस्थित होते. संस्थांच्या वतीने पाणी, चहा, बिस्कीट, मोफत अल्पोपाहार, भोजन वाटप करण्यात आले.
२० हजार सॅनिटरी नॅपकिनचे मोफत वाटप : शिवाजी पार्कवर देशाच्या कानाकोपºयातून अनुयायी येतात. अनुयायांची व्यवस्था व्हावी, म्हणून विविध उपक्रम राबविले गेले. या वेळी सॅनिटरी नॅपकिन्सचे मोफत वाटप हा उपक्रम राबविण्यात आला होता. तरुणाईने २० हजार सॅनिटरी नॅपकिनचे वाटप केले. महिलांना आर्थिक अडचणीमुळे सॅनिटरी नॅपकिन विकत घेता येत नाहीत. म्हणून समाजाची सेवा करावी, या उद्देशाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६३व्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त चैत्यभूमी व शिवाजी पार्क येथे ५ ते ६ डिसेंबर या दिवशी आलेल्या मुली व महिलांना मासिकपाळी व स्वच्छतेबद्दल माहिती देत, सॅनिटरी नॅपकिनचे मोफत वाटप करण्यात आले.