'डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे परळ येथील निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून विकसित करणार'
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2019 09:48 AM2019-12-06T09:48:02+5:302019-12-06T09:49:35+5:30
गुरुवारी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून ही मागणी केली होती.
मुंबई - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज ६३ वा महापरिनिर्वाण दिन आहे. यानिमित्ताने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चैत्यभूमीवर जाऊन अभिवादन केले. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परळ येथील बीआयटी चाळीत आले होते.
परळ दामोदर हॉलजवळील बीआयटी चाळ येथील इमारतीत दुसर्या माळ्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर राहत होते. 1912 ते 1934 या कालावधीत 22 वर्षे त्यांचे येथे वास्तव्य होते. हे निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून विकसित करण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषणा केली आहे.
गुरुवारी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून ही मागणी केली होती. आयुष्यातील अनेक महत्वपूर्ण वर्षे ज्या चाळीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घालवली. तिथून जिथे त्यांनी मनुस्मृती जाळण्याचा निर्णय घेतला, जिथून ते वर्ल्ड टेबल कॉन्फरन्सला (गोल्मेज परिषदेला) गेले. जिथे त्यांना छत्रपती शाहू महाराज भेटले. त्या खोलीचे व त्या इमारतीचे राष्ट्रीय स्मारक करावे अशी मागणी जितेंद्र आव्हाडांनी केली होती.
दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, मंत्री जयंत पाटील यांनी चैत्यभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन केले. त्यावेळी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने या महामानवाला अभिवादन करण्यासाठी त्यांचे अनुयायी चैत्यभूमी, दादर परिसरात मोठ्या प्रमाणात येतात.
आ. @Awhadspeaks यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर ज्या इमारती मध्ये राहत होते ज्या खोलीमध्ये त्याचे बालपण गेले तेथे जाऊन भेट दिली.
— NCP Thane (@ThaneNCP) December 5, 2019
बी.आय.डी चाळीचे रूपांतर भव्य राष्ट्रीय स्मारकात व्हावे ही मागणी मा.मुख्यमंत्री @OfficeofUT यांच्याकडे आव्हाड यांनी केली आहे@Jayant_R_Patil@CMOMaharashtrapic.twitter.com/Z64SncK1wM
त्यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या स्मृतीस अभिवादन करताना दिलेल्या संदेशात ठाकरे म्हणाले, डॉ. बाबासाहेबांनी विषमतेविरुद्ध लढा पुकारला, त्यांचे जीवन हे धगधगते अग्निकुंड होते. माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी लढा उभारला. इंदू मिल येथील नियोजित स्मारक त्यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करणारे प्रेरणास्थान ठरेल. अन्यायग्रस्त, वंचित, आयुष्याची लढाई हरलेल्या माणसाला विषमतेविरुद्ध आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची तसेच जिंकण्याची प्रेरणा या स्मारकातून मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. हे सरकार सर्वसामान्य जनतेचे सरकार आहे. बाबासाहेबांनी दिलेला समतेचा, न्याय आणि बंधुतेच्या विचारांच्या दिशेने शासनाची वाटचाल राहील. इंदू मिल येथील स्मारकाचे काम गतीने पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.