डॉ. बर्वे यांच्या निलंबनास स्थगिती, मॅटचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 05:10 AM2018-04-07T05:10:26+5:302018-04-07T05:10:26+5:30
पुरेशी सक्षम कारणे नसताना महिला वैद्यकीय अधीक्षकाचे केलेले निलंबन हा सरकारी अधिकाराचा दुरुपयोग आहे, असा ठपका ठेवत मुंबई ‘मॅट’चे चेअरमन अंबादास जोशी आणि प्रशासकीय सदस्य प्रवीण दीक्षित यांनी या निलंबनाला गुरुवारी ५ एप्रिल रोजी स्थगिती दिली.
- राजेश निस्ताने
मुंबई - पुरेशी सक्षम कारणे नसताना महिला वैद्यकीय अधीक्षकाचे केलेले निलंबन हा सरकारी अधिकाराचा दुरुपयोग आहे, असा ठपका ठेवत मुंबई ‘मॅट’चे चेअरमन अंबादास जोशी आणि प्रशासकीय सदस्य प्रवीण दीक्षित यांनी या निलंबनाला गुरुवारी ५ एप्रिल रोजी स्थगिती दिली.
वैद्यकीय अधीक्षक डॉ. मंदाकिनी बर्वे या चांदवड (जि. नाशिक) येथे कार्यरत असताना बाह्यरुग्ण विभागात दुसराच कुणी तरी अज्ञात व्यक्ती डॉक्टर बनून रुग्णांची तपासणी करीत असल्याचे उघडकीस आले. या प्रकरणात हलगर्जीपणाचा ठपका ठेऊन डॉ. बर्वे यांना निलंबित केले गेले. या निलंबनाला त्यांनी महाराष्टÑ प्रशासकीय न्यायाधीकरणात (मॅट) आव्हान दिले होते.
विशेष असे, निलंबन आदेशात त्या अजूनही चांदवडलाच काम करीत असल्याचे दाखविले गेले. प्रत्यक्षात त्यांची चांदवडहून आधी ३० एप्रिलला लातूर येथे, नंतर नाशिक शहर व आता त्र्यंबकेश्वरला बदली झाली होती.
१२ एप्रिलला सुनावणी
चांदवडला रुग्णालयाच्या तीन इमारती आहेत. तेथे सुरक्षा व्यवस्था नाही, एकटा वैद्यकीय अधीक्षक कुठे कुठे लक्ष ठेवणार, तरीही डॉ. बर्वे यांनी कठोर भूमिका घेतली, असे ‘मॅट’ने नमूद केले. या प्रकरणात १२ एप्रिलला पुढील सुनावणी होणार आहे.