डॉ. बाबासाहेबांचे स्मारक २०२० पर्यंत पूर्ण करणार, मुख्यमंत्र्यांची ग्वाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 05:17 AM2018-04-14T05:17:46+5:302018-04-14T05:17:46+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी इंदू मिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजित स्मारकाच्या जागेला भेट देऊन पाहणी केली.
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी इंदू मिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजित स्मारकाच्या जागेला भेट देऊन पाहणी केली. हे स्मारक १४ एप्रिल २०२० पर्यंत पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
या स्मारकाचे दृष्य स्वरुपातील काम पुढील वर्षापासून दिसेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठीच्या सर्व परवानग्या मिळविण्यात आल्या आहेत. स्मारकाच्या काम कालबध्द पध्दतीने होण्याबाबतचे निर्देश संबंधितांना देण्यात आले आहेत, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार भाई गिरकर, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त यू.पी.एस. मदान, स्मारकाचे वास्तू विशारद शशी प्रभू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समितीचे सचिव नागसेन कांबळे आदी उपस्थित होते.
>चैत्यभूमीवर लगबग
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाची दादर पश्चिमेकडील चैत्यभूमीवर तयारी सुरू आहे. मंडप बांधणी, स्टेज बांधणी, विहार आणि चैत्यभूमीची सजावट, अशोकस्तंभाची सजावट, नागरिकांच्या सेवेसाठी व्यवस्था, फिरत्या शौचालयांची व्यवस्था करण्यात पालिकेच्या कर्मचाऱ्यांची आणि विविध संस्थांच्या कर्मचाºयांची घाई सुरू असून, विक्रेतेही येथे दाखल झाले आहेत.
चैत्यभूमीसह शिवाजी पार्क परिसर निळे झेंडे, डॉ. आंबेडकर यांच्या मूर्ती, फोटो यांनी गजबजला आहे. ऋणानुबंध अभियान संस्थेतर्फे शनिवारी सकाळी ११.३० वाजता चैत्यभूमीवर डॉ. आंबेडकरलिखित ‘मुक्ती कोण पथे?’ या पुस्तिकेच्या ५ हजार प्रतींचे मोफत वाटप करण्यात येईल. ऋणानुबंधचे अध्यक्ष डी.आर. कांबळे, सचिव पी.एस. पाटील, नरेंद्र पगारे, महेंद्र उबाळे, संजय जाधव, कल्याण गाडे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.