मुंबई - स्लिम ट्रिम राहणं, वाढत जाणारं वजन ताळ्यावर आणून ते घटवणं, ही आजच्या जमान्याची परवलीची डोकेदुखी! तिच्यातून सुटका करुन घेण्यासाठी अनेकजण जंगजंग पछाडतात. मोठया परिश्रमाने काहीजण यशस्वीही होतात, पण अनेकांच्या पदरी निराशाच येते. पण राजकारण-समाजकारणात तब्बल पन्नास वर्षांहून अधिक काळ सक्रीय राहात शिक्षण क्षेत्रातही चार-चार अभिमत विद्यापीठाच्या उभारणीचा विक्रम नोंदविणाऱ्या आणि वयाचा 83 वर्षांचा पल्ला पार केलेल्या डॉ.डी. वाय. पाटील यांनी स्लिम ट्रिम बनण्याची किमया केली आहे.
लहानपासूनच कोल्हापूरच्या तांबड्या मातीत अनेक फड गाजविणाऱ्या या पठ्ठ्याचे तसे मेहनतीने कमविलेलेच शरीर ! आपणास मात्र गेली अनेक वर्षे गुटगुटीत आणि साधारण शंभर किलो वजनाचा पल्ला गाठलेले डीवाय दादाच माहीत आहेत. परवा मुंबईत त्यांना भेटायला गेलो आणि सत्तर किलोच्या आत वजन असलेले स्लिम-ट्रिम दादा नेहमीच्याच उत्साहात दिसले. अजूनही थोडे वजन कमी करुन चक्क जॉगिंग करण्याची जिद्द त्यांनी व्यक्त केली. वयाचे शतक पार करणारच, असे मोठया आत्मविश्वासाने ठासून ते सांगत होते. हे त्यांनी कसे साध्य केले?अध्यात्मिक वैचारिक बैठक, समाधानी व आनंदी वृत्ती, वयास अनुरुप सातत्यपूर्ण हलका व्यायाम आणि खाण्यावर कमालीचे नियंत्रण, यामुळेच हे शक्य झाले, हे ते आवर्जून सांगतात. डी वाय दादांचा आणि माझा परिचय गेल्या 16 वर्षांपासूनचा. मग ओघाने त्यांचे चिरंजीव संजय, सतेज उर्फ बंटी, विजय, अजिंक्य यांचाही परिचय झाला. 1965 नंतरच्या देशाच्या व महाराष्ट्राच्या राजकीय प्रवासाचे ते सक्रीय साक्षीदार! कोणत्याही घटनेची आठवण अगदी तारीख, वेळ व संबंधित नावांसह तोंडपाठ. काँग्रेसच्या इतिहासात ठळक नोंद झालेला संघर्ष असो वा नंतरच्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात यशवंतराव चव्हाण साहेबांचे "मानसपुत्र" म्हणून शरद पवार साहेबांचा उदय असो, राजकारणातील घटनांचे दादांच्या तोंडून वर्णन ऐकणे म्हणजे ती एक पर्वणीच! वसंतदादा पाटील यांच्या विरोधकांचे मित्र म्हणून ओळख असूनही मुख्यमंत्री वसंतदादांनी डीवाय दादांना एकाच बैठकीत शिक्षण संस्थांच्या तब्बल 27 प्रस्तावांना मंजुरी देण्याची दिलदारी कशी दाखविली, वसंतदादाच्या विरोधातील गाजलेले शरद पवार साहेबांचे बंड नेमके काय आणि कसे होते, 2002 साली विलासराव-सुशीलकुमार यांच्यातील मुख्यमंत्रीपदाच्या रस्सीखेसीत सुशीलकुमार नेमके कशात कमी पडले होते, इथपासून ते आज चंद्रकांतदादा पाटील यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणशैली पर्यंत दादांशी गप्पा मारण्यातील मजा काही औरच! दोन वेळा आमदार राहिलेला हा माणूस आमदारकीला दोन वेळा पडल्याचे आवर्जून सांगतो! आमदार आणि राज्यपालपदाचे केवळ एक रुपया मानधन घेणाऱ्या दादांसोबत वर्ष-दिडवर्षापूर्वी कोल्हापुरातील त्यांच्याच मल्टिप्लेक्समध्ये अमिताभ बच्चनचा "वजीर" हा सिनेमा पाहिला. सिनेमाच्या मध्यंतरावेळीच दादांनी सिनेमात "वजीर" कोण असणार याचा अंदाज सांगून टाकला होता. क्षेत्र कुठलेही असो, पिढी कोणतीही असो, काळाची अचूक नस पकडत माणुसकी जतन करणारे डॉ. डी.वाय. पाटील दादा आज 83 वर्षांचा पल्ला पार करुन 84 व्या वर्षात पाऊल ठेवत आहेत.. दीर्घायुष्यासाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा!
(लेखक लोकमतचे राजकीय संपादक आहेत)