मुंबई : इंदू मिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची उंची वाढविण्याच्या निर्मयामुळे खर्चातही वाढ झाली आहे. त्यामुळे या स्मारकाचे काम पूर्ण करण्याची मुदत एप्रिल, २०२३ पर्यंत वाढविण्यात आली आहे. प्राथमिक नियोजनानुसार हे काम फेब्रुवारी, २०२१ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते.
११ ऑक्टोबर, २०१५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते या भव्य स्मारकाचे भूमिपूजन झाले होते. त्यावेळी या कामाची अंदाजीत किंमत ७६३ कोटी होती. त्यानंतर निविदा प्रक्रियेनुसार या कामासाठी मे. शापुरजी पालनजी या कंपनीची नियुक्ती करून ९ फेब्रुवारी, २०१८ रोजी त्यांना कार्यारंभ आदेश देण्यात आला. त्यावेळी तीन वर्षांत म्हणजेच फेब्रुवारी, २०२१ पर्यंत काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, गेल्या वर्षी या स्मारकाची उंची ३५० फुटांवरून ४५० फुट करण्याचा निर्णय विद्यमान सरकारने घेतला. त्यासाठी स्मारकाचे पुनर्नियोजन करून संरचनात्मक रचनाही बदलण्यात आली आहे. कामाचा खर्चही १०८९ कोटींपर्यंत वाढला आहे. काम पूर्ण करण्यास जास्त विलंब नको म्हणून नव्याने निविदा प्रक्रिया न राबविता शापुरजी पालनजी या कंपनीलाच हे काम देण्यात आले आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी आता एप्रिल, २०२३ पर्यंतची मुदत कंत्राटदाराला देण्यात आली आहे. सुधारित प्रस्तावानुसार या कामाचे भूमिपुजन गेल्या आठवड्यात होणार होते. मात्र, आमंत्रणावरून गोंधळ निर्माण झाल्यानंतर ते रद्द करण्यात आले. मात्र, लवकरच हा भूमिपुजन सोहळा संपन्न होईल आणि काम वेगाने सुरू होईल अशी माहिती एमएमआरडीएतल्या सुत्रांनी दिली.