Join us

‘जेजे’ रुग्णालयातील डॉ. कुरा सक्तीच्या रजेवर; त्वचारोग विभागातील निवासी डॉक्टरांचे आंदोलन कायम

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2023 7:13 AM

त्वचारोग विभागातील निवासी डॉक्टरांच्या आंदोलनाला जे जे निवासी डॉक्टर संघटनेने पाठिंबा दर्शविला  होता.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : जे. जे. रुग्णालयातील त्वचारोग विभागप्रमुख डॉ. महेंद्र कुरा यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून तीन  दिवसांपासून २१ निवासी डॉक्टर सामूहिक रजेवर गेले आहेत.  याप्रकरणाची  दखल घेऊन  राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्वचारोग विभागप्रमुख डॉ. महेंद्र कुरा यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचे आदेश विभागाला दिले. २१ निवासी डॉक्टरांचे आंदोलन कायम राहणार आहे.   

त्वचारोग विभागातील निवासी डॉक्टरांच्या आंदोलनाला जे जे निवासी डॉक्टर संघटनेने पाठिंबा दर्शविला  होता. तसेच या निवासी डॉक्टरांची मागणी पूर्ण न झाल्यास गुरुवारपासून रुग्णालयातील सर्व निवासी डॉक्टर संपावर जातील, असा इशारा दिला होता. मात्र सद्यस्थितीत विभागप्रमुखांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याप्रकरणी डॉ. महेंद्र कुरा यांना वारंवार संपर्क करूनही त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. याप्रकरणी मंगळवारी  वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने नेमलेल्या चौकशी समितीने त्यांचा अहवाल सादर केला होता. तत्पूर्वी मंगळवारी डॉ. कुरा यांनी जे जे रुग्णालय प्रशासनाला पत्र लिहून वैयक्तिक कामासाठी १५ दिवसांच्ये रजेचा अर्ज केला होता.

या प्रकरणाची दखल घेत आम्ही दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी समिती नेमली होती. त्यांचा अहवाल आला आहे. त्यानुसार मी आमच्या विभागाला संबंधित त्वचारोग विभाग प्रमुखांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचे आदेश विभागाला दिले आहे. तसेच अधिवेशन संपल्यानंतर आम्ही निवासी डॉक्टरांशी या आणि त्यांच्या विविध विषयांवर बोलणार आहे.  - हसन मुश्रीफ, वैद्यकीय शिक्षण मंत्री

२८ डिसेंबरपर्यंत  वाट बघणार  जे जे निवासी डॉक्टर संघटनेचे अध्यक्ष डॉ. शुभम सोहनी यांनी सांगितले की, “आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार त्वचारोग विभाग प्रमुखांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे.  त्या काळात जो चौकशी समितीचा अहवाल त्याचा अभ्यास करून सरकारने त्यांना या रुग्णालयातून काढून टाकावे, अशी मागणी कायम आहे.  त्यामुळे २१ तारखेला होणार संप आम्ही पुढे ढकलला असून २७ पर्यंत वाट बघणार आहोत. त्यानंतर मात्र मागणी पूर्ण न झाल्यास २८ डिसेंबरपासून आम्ही बेमुदत संपावर जाणार असल्याचे पत्र आम्ही रुग्णालय प्रशासनापासून ते वैद्यकीय शिक्षण विभागाच्या मंत्र्यांना दिले आहे.