Join us  

डॉ. गुप्ता यांचे युनिट घेतले काढून, ‘जेजे’मधील क्लिनिकल ट्रायल रूमही केली सील

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2023 11:04 AM

कोरोना काळात महापालिकेतर्फे देण्यात आलेल्या कंत्राटांची सध्या चौकशी सुरू आहे.

मुंबई : ईडीची छापेमारी सुरू असतानाच, सर जेजे  रुग्णालयात मेडिसिन विभागात गेल्या पंधरा वर्षांपेक्षा अधिक वर्ष मानसेवी प्राध्यापक म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉ. हेमंत गुप्ता यांचे युनिट गुरुवारी तडकाफडकी काढून घेण्यात आले आहे.  तसेच ते रुग्णालयाच्या ज्या क्लिनिकल ट्रायल रूममध्ये काम करत होते. ती  रूमही सील करण्यात आल्याने रुग्णालयात खळबळ उडाली आहे.  

कोरोना काळात महापालिकेतर्फे देण्यात आलेल्या कंत्राटांची सध्या चौकशी सुरू आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांच्या उपचारांसाठी लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस कंपनीला कंत्राट देण्यात आले होते. त्यामध्ये संचालक असलेल्या डॉ. हेमंत गुप्ता यांच्यासह सुजित पाटकर, संजय शहा आणि राजू साळुंखे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुरुवारी  रुग्णालय प्रशासनाने केलेल्या या कारवाईमुळे रुग्णालयात या विषयाला घेऊन सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. डॉ. गुप्ता मानसेवी प्राध्यापक म्हणून मेडिसिन विभागात कार्यरत आहेत.

शनिवारी त्यांच्या युनिटची ओ. पी. डी. असते. तसेच पदव्युत्तर शाखेचे तीन विद्यार्थी त्यांच्या मार्गदर्शनाखाली मेडिसिन विषयात शिकत आहेत. या  रुग्णांना उपचार देण्यासोबत  त्यांच्या कामाचा भाग म्हणून येथे क्लिनिकल ट्रायलसुद्धा करत होते. रुग्णालयातील वरिष्ठ सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. गुप्ता यांचे युनिट काढून घेण्यात आले असून, त्यांच्याऐवजी हे युनिट दुसऱ्या डॉक्टरांना देण्यात आले आहे. तसेच ते क्लिनिकल ट्रायल करत असलेली रूमही सील करण्यात आली आहे.

टॅग्स :जे. जे. रुग्णालयमुंबई