मुंबई - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात बाबासाहेबांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. सुप्रसिद्ध शिल्पकार पद्मभूषण राम सुतार यांच्याकडून गाझियाबाद येथे या पुतळ्याची २५ फुटांची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. या प्रतिकृतीच्या आधारावरच मूळ पुतळा उभारण्यात येणार आहे. यावेळी सुतार यांनी उभारण्यात येणाऱ्या पुतळ्याबद्दलचे सादरीकरण केले.
सामाजिक न्याय विभागाच्यावतीने आयोजित दौऱ्यामध्ये भीमराव आंबेडकर, आनंदराज आंबेडकर, विधानसभा सदस्य संजय बनसोडे, यामिनी जाधव, माजी मंत्री सुलेखा कुंभारे, डॉ. राजेंद्र गवई, जयदीप कवाडे, भदंत राहुल बोधी यांसह सामाजिक क्षेत्रात कार्य करणारे सदस्य, सामाजिक न्याय विभागाचे आयुक्त प्रशांत नारनवरे, सहसचिव दिनेश डिंगळे, सर ज.जी. कला महाविद्यालयाचे अधिष्ठाता प्रा.विश्वनाथ साबळे आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी येथे आयोजित बैठकीतील चर्चेत सहभागी होऊन डॉ. बाबासाहेबांच्या स्मारकातील डॉ.बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या प्रतिकृतीविषयी समाधान व्यक्त केले.
दरम्यान, देश-विदेशातील डॉ. बाबासाहेबांचे अनुयायी या स्मारकाला भेट देवून त्यांच्या भव्य पुतळ्यापासून प्रेरणा घेतील, अशी भावना सर्वांनी यावेळी व्यक्त केल्या.