मुंबई - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर मोठा जनसागर उसळला आहे. देशाच्या कानाकोपऱ्यांतून या महामानवास आज श्रद्धांजली अर्पण केली जात असून चैत्यभूमीवर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते यांच्यापासून ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही महामानवांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन केलं. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रीही चैत्यभूमीवर पोहोचले होते. यावेळी, माध्यमांशीही त्यांनी संवाद साधला. मुंबईच्या इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेबांच्या स्मारकाचे काम लवकरात लवकर पूर्ण केले जाईल, असे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला राज्यघटना दिली. त्यात लोकशाही, स्वातंत्र्य सगळेच आले. लोकशाही म्हणजे संवाद. शासन आणि जनता यांच्यातील संवाद, म्हणजेच खरीखुरी लोकशाही. बहुसंख्याक आणि अल्पसंख्याक यांच्यातील संवाद लोकशाहीला अभिप्रेत आहे. बाबासाहेबांनी जी घटना दिली, त्या घटनेने हे सर्व अधिकार व स्वातंत्र्य आपल्याला दिले. त्यामुळेच, आज देशातील प्रत्येक नागरिक महामानवांचे स्मरण करुन त्यांना अभिवादन करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही राजधानी दिल्लीत अभिवादन केले आहे. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेबांना आदरांजली वाहिली.
“आज महापरिनिर्वाण दिनामित्त मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो. आज आपण केवळ बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच जगामध्ये ताठ मानेने उभे आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेमुळे सर्वसामान्यांना अधिकार प्राप्त झाले. त्यांना जगण्याचा हक्क मिळाला. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच सर्वसामान्य माणूस सर्वोच्च पदावर जाऊ शकला. राज्यातही माझ्यासारखा सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती मुख्यमंत्री होऊ शकली. मला राज्याची सेवा करण्याची संधी मिळाली. हे केवळ बाबासाहेबांच्या संविधानामुळे शक्य झाले. मी बाबासाहेबांचा शतश: ऋणी आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केले. दरम्यान, यावेळी, त्यांनी मुंबई महापालिकेतर्फे आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित छायाचित्र प्रदर्शनास भेट दिली. बृहन्मुंबई महानगरपालिकेने तयार केलेल्या माहिती पुस्तिकेचे आणि लोकराज्यच्या विशेषांकाचे यासमयी प्रकाशन करण्यात आले.