लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: आचार्य अत्रे समितीतर्फे दरवर्षी देण्यात येणारा प्रतिष्ठेचा ‘काकासाहेब पुरंदरे पत्रकारिता पुरस्कार’ लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन आणि माजी खासदार डॉ. विजय दर्डा यांना जाहीर झाला आहे. आचार्य अत्रे समितीचे संस्थापक काकासाहेब पुरंदरे यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो. आचार्य अत्रे यांच्या १२६व्या जयंतीनिमित्त वरळी नाका येथील आचार्य अत्रे चौकात मंगळवारी आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार जाहीर करण्यात आला.
यावेळी आचार्य अत्रे यांचे नातू ॲड. राजेंद्र पै, पणतू आणि समितीचे उपाध्यक्ष ॲड. अक्षय पै, नातसून बीना पै, आचार्य अत्रे समितीच्या अध्यक्षा आरती पुरंदरे-सदावर्ते, खजिनदार शिबानी जोशी, समितीचे सरचिटणीस आणि माजी नगरसेवक अरविंद भोसले, सहचिटणीस दीपक देवगोंडे, समिती सदस्य रवींद्र आवटी, श्रीकांत मयेकर, मोहन म्हामुणकर, दिवाकर करकेरा आदी मान्यवर उपस्थित होते.
आचार्य अत्रे यांच्या लेखणी आणि कुंचल्यातून निघालेल्या शब्दांनी राज्य गाजविले होते. ते उत्तम वक्ते होते. लेखणी तलवार असते असे आपण म्हणतो, ते त्यांच्या लेखणीतून जाणवत होते. मात्र, त्यांचे अंत:करण हे एखाद्या लहान मुलासारखे होते, असे प्रतिपादन डॉ. विजय दर्डा यांनी केले. त्यांचे अग्रलेख वाचून अनेक पत्रकार घडले. बातमीचा मथळा कसा लिहायचा, हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. ‘लोकमत वृत्तपत्रा’च्या वाढीत जसे स्वातंत्र्य संग्राम सेनानी आणि ‘लोकमत’चे संस्थापक - संपादक जवाहरलाल दर्डा (बाबूजी) यांचे योगदान आहे, तसेच आचार्य अत्रे यांच्याकडून मिळालेल्या प्रेरणांचाही वाटा आहे, असेही डॉ. दर्डा यांनी नमूद केले. आज राज्याचे वातावरण बदलेले आहे. त्यामुळे आचार्य अत्रे यांची उणीव भासते, असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी वरळी येथील आचार्य अत्रे चौकातील आचार्य अत्रे यांच्या पुतळ्याला डॉ. विजय दर्डा यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाचे अरविंद भोसले यांनी सूत्रसंचालन केले.
आचार्य अत्रेंची परंपरा ‘लोकमत’ समर्थपणे चालवित आहे...
आज आचार्य अत्रे हवे होते. राज्यातील परिस्थिती बघता हे प्रकर्षाने जाणवते. आचार्य अत्रे यांनी आत्मशोधाची प्रचिती सर्वांना दिली. आचार्य अत्रे यांची परंपरा ‘लोकमत’चे संस्थापक समर्थपणे पुढे चालवित आहे, असे ॲड. राजेंद्र पै यांनी सांगितले. राज्याच्या कल्याणासाठी, मराठी माणसाच्या भल्यासाठी त्यांनी जे काही केले ते आपण करायला हवे, असेही पै यांनी नमूद केले.