Join us

अंगावर पांढरे डाग पडले, जगण्याची इच्छा संपली... अन् उभे राहिले महान कार्य 

By अतुल कुलकर्णी | Published: October 02, 2022 8:54 AM

नवरात्रीच्या निमित्ताने लोकमत वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या नऊ महिलांच्या कार्याची आपल्याला ओळख करून देणार आहे. या सदरातून आपल्या भेटीला येतील वेगवेगळ्या प्रेरणादायी महिलांच्या कहाण्या...

अतुल कुलकर्णी, लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : अंबाजोगाई हे मूळ गाव सोडून १९७३ मध्ये लग्नानंतर त्या मुंबईत आल्या. मात्र, मुंबईचे हवामान काही त्यांना सोसवेना. पाणी प्यायले तरी सहन होईना. वजनही घटू लागले. उरळीकांचनला जा, असा सल्ला त्यांना कोणीतरी दिला. त्या दोन महिन्यांत निसर्गोपचाराची आवड निर्माण झाली. पुढे बाळंतपणानंतर अंगावर पांढरे डाग उमटू लागले. त्यातून आत्महत्येचे विचार बळावू लागले. मनाचा हिय्या करून आत्महत्येची तयारीही केली. सुदैवाने आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी नवऱ्याच्या हाती लागल्याने तो प्रसंग टळला. पतीदेवांनीच निसर्गोपचाराच्या अभ्यासाचा आग्रह धरला. 

निसर्गोपचाराच्या माध्यमातूनच त्यांनी अंगावरील पांढरे डाग घालवले आणि तिथून सुरू झाला एक आनंदी प्रवास... एखाद्या चित्रपटाची कथा असावी, असा हा जीवनपट आहे डॉ. कुमुद जोशी यांचा.

डॉ. कुमुद जोशी गेली ५० वर्षे निसर्गोपचार करत आहेत. या कार्यात त्यांनी स्वतःला झोकून दिले आहे. आज त्यांचे वय ७० वर्षे आहे. पण तरुणालाही लाजवेल या गतीने त्या काम करत असतात. आजपर्यंत केलेल्या उपचाराचे त्यांनी कधी कोणाला पैसेही मागितले नाहीत. त्यांच्यापासून प्रत्येकाने प्रेरणा घ्यावी, असे काम कुमुदताई करत आल्या आहेत. खऱ्या अर्थाने त्या आजच्या आधुनिक नवदुर्गाच आहेत. नंदा बिर्ला, रामकृष्ण बजाज, वसंतदादा पाटील, अशोक कुमार, देव आनंद अशा असंख्य दिग्गजांनी कुमुदताईंकडे निसर्गोपचार घेतले आहेत. 

दादरला १९८८ मध्ये कुमुदताईंनी भाड्याच्या जागेत क्लिनिक सुरू केले. ४० वर्षे त्या तिथे कार्यरत होत्या. काही वर्षांनी ज्यांची जागा होती त्यांनी ती विकायला काढली. पुढे लोणावळ्याला शेखर चरेगावकर यांनी त्यांना जागा उपलब्ध करून दिली. जेथे त्यांनी निसर्गोपचाराचे कॅम्प सुरू केले. आता त्या पनवेलच्या कुष्ठरोग निवारण समितीच्या उपाध्यक्षा म्हणून कार्य करत आहेत. 

मन चांगले तर शरीर चांगले

निसर्गोपचारात मनाचा भाग फारसा शिकवला जात नाही. मात्र कुमुदताईंनी मनाचा अभ्यास सुरू केला. मन स्वच्छ असेल तर शरीर आणि आयुष्य देखील कसे स्वच्छ होतं, हे त्यांनी स्वतःवरून दाखवून दिलं. स्वतःच्या शरीरावरचे डागही त्यांनी स्वच्छ मनाने घालवले. त्यांच्या आयुष्यात आठ भाषा अवगत असलेले, उत्कृष्ट कलावंत असणारे अनिल जोशी पती म्हणून आले. त्यांनी दिलेली साथ त्यांच्या आयुष्याला दिशा देऊन गेली. शांतिवनाच्या उपाध्यक्ष असल्या तरी स्वत:च्या जेवणाचे पैसे त्या देतात. महात्मा गांधीजींचा निसर्गोपचार अंमलात आणत असल्याचे त्या आवर्जून सांगतात. 

चांगल्या विचारांचा परिणाम अन्नावर 

कुमुदताई स्वयंपाक करताना चांगले स्तोत्र लावतात. चांगली गाणी लावतात. तुम्ही स्वयंपाक करत असताना किंवा जेवताना मनात चांगले विचार आले तर अन्नावर त्याचा परिणाम होतो. ते खाताना तुमच्या शरीरावर चांगला परिणाम होतो, हेही त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :नवरात्रीमुंबई