मुंबई : कोकण मराठी साहित्य परिषदेचे (कोमसाप) केंद्रीय अध्यक्ष डॉ. महेश केळुसकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. याशिवाय एका विश्वस्तांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचे सांगत त्यांनी गेल्यावर्षी मिळालेला 'कविता राजधानी' पुरस्कारही संस्थेला परत केला आहे.
डॉ. महेश केळुसकर यांची कोमसापच्या केंद्रीय अध्यक्षपदी तिसऱ्यांदा बहुमताने फेर निवड झाली होती. डहाणू येथे झालेल्या सर्वसाधारण सभेत डॉ. महेश केळुसकर यांची निवड करण्यात आली होती. दरम्यान, डॉ. महेश केळुसकर यांनी आज कोमसापच्या केंद्रीय अध्यक्षपदाचा राजीमाना विश्वस्त मंडळाकडे सादर केल्याचे फेसबुकवर पोस्ट लिहून सांगितले आहे.
डॉ. महेश केळुसकर यांची फेसबुकवरील राजीनाम्याची पोस्ट....
मेहरबानांस जाहीर व्हावे------------------------------
कळविण्यात येते की,गतसाली ९ मे २०१८ रोजी डहाणू येथे झालेल्या कार्यकारिणीच्या विशेष सभेत,माझी कोमसापच्या केंद्रीय अध्यक्षपदी सर्वानुमते पुन्हा एकदा (पुढील ३वर्षांसाठी)निवड झाली होती.तथापि गेल्या वर्षभरात जे अनुभव आले व २०एप्रिल २०१९ रोजी मालगुंड येथे झालेल्या सभेत जो अनुभव आला,त्यावरून इत:पर या संस्थेत मला काम करणे अशक्य आहे,असा निष्कर्ष निघाला.आणि २२ एप्रिल २०१९ रोजी (परत न घेण्यासाठी)अध्यक्षपदाचा राजीनामा विश्वस्त मंडळाकडे सादर केला.याबाबत किमान ८ दिवस कोठेही वाच्यता करू नये,अशा सूचना मला होत्या.आता १५ दिवस होऊन गेल्यावर,हे जाहीर करणे मी माझे कर्तव्य समजतो.ज्या संस्थेत २८ वर्षे आपल्या मगदुराप्रमाणे ,पण मराठी भाषा व साहित्य हाच विषय व एकमेव उद्दिष्ट समोर ठेवून निरपेक्ष काम केले,ती संस्था (अगदीच नाईलाज झाल्याने)सोडताना कोणालाही दु:ख होणारच.या काळात ज्यांनी सहकार्य केले,त्यांचे मनापासून आभार मानतो.जे कळत नकळत दुखावले गेले,त्यांची मनापासून क्षमा मागतो.कारणे जाणून घेण्यासाठी किंवा सहानुभूती दर्शविण्यासाठी फोन करू नयेत,असे नम्र आवाहन करतो. जय कोमसाप!२०१८ चा 'कविता राजधानी'पुरस्कार मेरिटवर स्वीकारताना मला आनंद झाला होता.पण त्यावरही ,संस्थेत अलिकडेच आलेल्या एका विश्वस्तांकडून प्रश्नचिन्ह लावण्यात आल्याने तो पुरस्कारही साभार परत करून प्राप्त रक्कम मी संस्थेच्या बँक अकाऊंटमधे जमा केलेली आहे.जय 'कविता राजधानी' !मेहरबानांस जाहीर व्हावे.लोभ असावा,ही विनंती.आपला नम्र,महेश केळुसकर./मुंबई ०९ मे २०१९.-----------------------------------(गेल्या वर्षीची ,९ मे २०१८ ची पोस्ट पुढिल प्रमाणे )(वैयक्तिक व कार्यालयीन कामांमुळे दमणूक वाढल्याने नको नको म्हणत असताना ) पुन्हा एकदा 'कोमसाप ' चे केंद्रीय अध्यक्षपद कार्यकर्त्यांच्या प्रेमाग्रहाखातर स्वीकारावे लागले. आता 2018 ते 2021 (मार्च अखेर ) पर्यंत सुटका नाही. गेली 6 वर्षे माझ्या अल्प मगदुराप्रमाणे अध्यक्ष म्हणून मी काम केले. पुढची 3वर्षे कशी जातात बघू. पण झोकून देउन काम करणारे शेकडो बहुजन कार्यकर्ते हेच कोमसाप ची पालखी पुढे पुढे नेत आहेत आणि हेच कोमसाप चे खरे बळ आहे. यंदापासून केंद्रीय कार्यकारिणीत अनेक तरुण तडफदार कार्यकर्ते सामील झाले आहेत. तेच उद्याची आशा आणि उमेद आहेत. महाराष्ट्रात आणि सर्वत्र 'कोमसाप ' चा झेंडा तेच फडकत ठेवणार आहेत...अभिनंदन संदेश पाठवणार्या सर्व सुहृदांचे मनापासून आभार! देव बरे करो !