मुंबई : वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाच्या संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार डॉ. दिलीप म्हैसेकर यांना सोपविण्यात आला आहे. ते सध्या नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रभारी अधिष्ठाता म्हणून कार्यरत होते. यापूर्वीही त्यांनी प्रभारी संचालक म्हणून जुलै २०२१ ते जुलै २०२३ कालावधीत काम पहिले आहे. त्यांना या कामाचा उत्तम अनुभव असून, त्यांनी या कालवधीत उत्तम प्रशासक म्हणून कामाची छाप सोडली होती.
सद्यस्थितीत सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले यांच्याकडे अतिरिक्त संचालकपदाचा कार्यभार होता. डॉ. म्हैसेकर यांनी गुरुवारी पदाचा कार्यभार स्वीकारल्याने डॉ. चंदनवाले यांना पुन्हा सहसंचालक म्हणून काम पाहावे लागणार आहे. डॉ. चंदनवाले यांनी तीन महिन्यांपूर्वीच या पदाचा कार्यभार हाती घेतला होता. डॉ. म्हैसेकर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरुदेखील होते.