Join us

डॉ. नीरज हातेकर पीएच.डी.प्रकरणी चौकशीचा अहवाल तयार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2018 6:13 AM

मुंबई विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाचे माजी संचालक डॉ. नीरज हातेकर यांच्या पीएचडीवरून सुरू असलेल्या वादाबाबतचा चौकशी अहवाल मुंबई विद्यापीठाने तयार केला आहे.

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाचे माजी संचालक डॉ. नीरज हातेकर यांच्या पीएचडीवरून सुरू असलेल्या वादाबाबतचा चौकशी अहवाल मुंबई विद्यापीठाने तयार केला आहे. व्यवस्थापन परिषदेकडे निर्णयासाठी सादर केल्यानंतर या अहवालाची प्रत दिली जाणार असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना मुंबई विद्यापीठाने दिली आहे. या अहवालाबाबत विद्यापीठ कमालीची गुप्तता पाळत आहे. त्यामुळे या अहवालात नेमके काय दडलेय याबाबत आता सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे.डॉ. नीरज हातेकर यांच्यावर त्यांची पत्नी रजनी माथुर यांच्या प्रबंधातून साहित्याची चोरी केल्याचा आरोप होताच कुलपती आणि राज्यपाल विद्यासागर राव यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी डॉ. नीरज हातेकर यांची झालेली चौकशी आणि त्यासंदर्भात तयार झालेल्या अहवालाची प्रत मागितली होती. मात्र, डॉ. नीरज हातेकर यांच्या वाङ्मयचोरीचा चौकशीचा अहवाल व्यवस्थापन परिषदेकडे निर्णयासाठी सादर केल्यानंतरच त्या अहवालाची प्रत देण्यात येईल, असे मुंबई विद्यापीठाच्या प्रबंध विभागाच्या उपकुलसचिवांनी अनिल गलगली यांना कळविले आहे.या अहवालासंदर्भात मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांना विचारले असता अहवाल विद्यापीठाला प्राप्त झाला आहे. मात्र सर्वप्रथम तो व्यवस्थापन परिषदेत सादर होईल. त्यावरच त्यावर भाष्य करणे योग्य ठरेल, अशी प्रतिक्रिया देत त्यांनीही गुप्तता पाळली.>तत्काळ कार्यवाही अपेक्षितमुंबई विद्यापीठाने चौकशी अहवाल लवकरात लवकर सार्वजनिक करणे आवश्यक आहे. अहवाल व्यवस्थापन परिषदेकडे सादर करण्यात दिरंगाई करण्याऐवजी तत्काळ कार्यवाही अपेक्षित आहे. जेणेकरून मुंबई विद्यापीठाची प्रतिमा मलिन होणार नाही.- अनिल गलगली,आरटीआय कार्यकर्ते