डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण : ‘ती’ ठरली वरिष्ठांच्या रॅगिंगची शिकार, पती सलमानचे मत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2019 04:59 AM2019-05-31T04:59:31+5:302019-05-31T18:10:07+5:30
मूळचे जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्याचे रहिवासी असलेले सलमान तडवी हे कुपर रुग्णालयात साहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
मुंबई : डॉ. पायल तडवी आत्महत्याप्रकरणी बुधवारी न्यायालयात झालेल्या युक्तिवादात पायलने कौटुंबिक तणावातून आत्महत्या केल्याचा अंदाज आरोपींच्या वकिलांनी वर्तविला. मात्र, ‘आम्ही दोघेही परफेक्ट कपल असल्याचे पायल हिचे पती सलमान तडवी यांचे म्हणणे आहे. तसेच ती वरिष्ठांच्या रॅगिंगची शिकार ठरल्याचे सलमान यांनी सांगितले.
मूळचे जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्याचे रहिवासी असलेले सलमान तडवी हे कुपर रुग्णालयात साहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या गावापासून दोन तासांच्या अंतरावर असलेल्या चोपडा गावात पायल राहत होती. सलमानने दिलेल्या माहितीनुसार, २०१४ मध्ये पायल ही एमबीबीएस करत असल्याची माहिती मिळाली. त्या गावातील पहिलीच मुलगी डॉक्टर होणार हे ऐकून मी तिच्या प्रेमात पडलो. कुटुंबीयांनी त्यांचे घर गाठून लग्नाची बोलणी केली. तिनेही होकार दिला. शिक्षण सुरू असल्याने दोन वर्षे थांबण्याचे ठरवले. २०१६ मध्ये पायल एमबीबीएस झाली आणि ठरल्याप्रमाणे आम्ही दोघे विवाहबद्ध झालो.
पायलचे वडील सलीम तडवी यांच्या जबाबातदेखील पायल आणि सलमान दोघेही आनंदी होते. सलमान नेहमीच पायलच्या उच्च शिक्षणासाठी धडपड करत होता. तिच्यासाठी तो मुंबईत आला. गेल्या दोन वर्षांत पायलने सलमानविरुद्ध एकही तक्रार केली नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
सलमानने सांगितले की, लग्नानंतर भूलशास्त्रामध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अखेरच्या वर्षाचे शिक्षण घेत असताना, पायलला इंटर्नशिपसाठी औरंगाबादला जावे लागले. ती एक वर्ष औरंगाबादलाच होती. माझेही एमडीचे शिक्षण पूर्ण होताच मी औरंगाबादला तिच्यासोबत राहू लागलो. पुढे तिने नीटची परीक्षा देण्याचे ठरवले आणि २०१८ मध्ये ती त्यात पास झाली. तिला मुंबईच्या नायर रुग्णालयात संधी मिळाली. तर मी नीटमध्ये पास झाल्यावर मला अंधेरीच्या कुपर रुग्णालयात नोकरी मिळाल्याने मुंबईत आलो. पुढे दोघेही आनंदी होतो, असे सलमानने सांगितले.