Join us

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण: 'आरोपींना आयुष्यभर कलंक घेऊन जगू दे, हीच त्यांची शिक्षा'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2019 3:53 AM

कोर्टाचा संताप; खटला जलदगतीने चालविण्याचे आदेश देणार नाही

मुंबई : आरोपींच्या वर्तवणुकीमुळे व त्यांच्या वृत्तीमुळे एका तरुण डॉक्टरने अगदी टोकाचे पाऊल उचलून आयुष्य संपवले, हे दुर्दैवी आहे. या तिघींना या कलंकासह समाजात वावरू द्या. त्यांच्याविषयी मला अजिबात सहानुभूती नाही. त्यामुळे या तिघींवरील खटला जलदगतीने चालवा, असा आदेश मी देणार नाही. त्यांना आयुष्यभरासाठी धडा शिकू द्या, असे न्या. साधना जाधव यांनी संतप्त होत म्हटले.त्या तिघींनाही (डॉ. हेमा अहुजा, डॉ. भक्ती मेहरे व न्या. अंकिता खंडेलवाल) त्यांच्या गुणांवर मोठा गर्व होता. त्यांचा हाच अहंभाव त्यांना नडला. त्यांच्या या अहंभावामुळे एका तरुण डॉक्टरने आत्महत्या केली. सतत ६५ टक्क्यांनी उत्तीर्ण होणारी मुलगी ‘ढ’ कशी? एवढ्या हुशार मुलीला आरोपी ‘ढ’ कशा म्हणू शकतात? असे न्यायालयाने डॉ. पायल तडवी हिच्या आत्महत्येवर खेद व्यक्त करताना म्हटले.तीन आरोपींपैकी दोघी महाराष्ट्रातीलच आहेत. एक अकोला तर दुसरी अमरावतीमधील आहे. मात्र, तिसरी आरोपी मध्य प्रदेशातील आहे. बहुतेक तिच्यामुळे या दोघी वाहावत गेल्या. या दोघींना महाराष्ट्रातील दुर्गम भागातील स्थितीची माहिती आहे. या मुली अत्यंत असंवेदनशील आहेत. त्यांना ते जग माहीत नाही. पायल तडवीची पार्श्वभूमी काय आहे, हे त्यांना माहीत नाही. या घटनेमुळे राज्यातील दुर्गम भागातील पालक मुलांना शिकण्यासाठी येथे पाठवतील काय? कारण त्यांच्यासाठी त्यांच्या मुलाचे कल्याण महत्त्वाचे आहे, असे न्यायालयाने म्हटले.‘मला यांच्याविषयी (आरोपी) अजिबात सहानुभूती नाही. त्यांच्या स्वभावामुळे एका तरुण डॉक्टरने आत्महत्या केली. त्यांच्यावरील खटला जलदगतीने चालविण्याचा आदेश मी देणार नाही. आयुष्यभर त्यांना हा दोष घेऊन जगू दे, अशी कठोर भूमिका न्यायालयाने आरोपींना धडा शिकविण्यासाठी घेतली.वैद्यकीय न्यायालयांत रॅगिंगचे प्रकार फार पूर्वीपासून चालत आहेत. आता हे बंद करा. महाविद्यालय प्रशासनाने याला आळा बसवावा. त्यासाठी या घटनेला जबाबदार असलेल्या विभागप्रमुखांवर शिस्तभंगाची कारवाई व्हावी, असे मला वाटते.‘...तर ही वेळ ओढवली नसती’विभागप्रमुखांनी त्यांचे काम चोख बजाविले असते तर ही वेळ ओढवली नसती. पीडितेच्या पतीने व आईने त्यांच्याकडे तक्रार केली. मात्र, लेखी तक्रार नाही म्हणून त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले. लेखी तक्रार केली तर आपल्या पत्नीला व मुलीला अधिक त्रासाला सामोरे जावे लागेल, या भीतीने त्यांनी लेखी तक्रार केली नाही. आपल्या हाताखालील विद्यार्थ्यांची काळजी घेणे आणि त्यांचे संरक्षण करणे, हे विभागप्रमुखांचे कर्तव्य आहे. परंतु, नायरच्या विभागप्रमुख त्यांच्या कर्तव्यात अपयशी ठरल्या, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.

टॅग्स :पायल तडवी